पुणे : पुणे शहरातील विविध भागातील नागरिकांनी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना नियमित मिळणाऱ्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वी कोथरूड भागातील नागरिकांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यातच आता उद्या (गुरुवारी) ६ फेब्रुवारीला देखील शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहकारनगर येथील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद आहे. संपूर्ण दिवसभर हा पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे शुक्रवारी ७ फेब्रुवारीला या भागात उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.

दोनच दिवसांपूर्वी एसएनडीटी जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जाणाऱ्या कोथरूड येथील काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. या परिसरात नवीन जलवाहिनी जोडण्याचे काम केले जाणार होते, त्यामुळे हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पाणीपुरवठा बंद ठेवल्याने नागरिकांच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या.

सहकारनगर भागात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत जलवाहिनीची जोडणी करण्यासाठी तसेच दुरुस्ती केली जाणार आहे. या कामासाठी या परिसरातील पाणीपुरवठा ६ फेब्रुवारीला संपूर्ण दिवस बंद राहील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिली आहे. या कामामुळे गुरुवारी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे आणि पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार ?

सहकार नगर भागात असलेल्या तुळशीबागवाले कॉलनी, मेघना सोसायटी, सहकारनगर क्रमांक २ येथील कमानीच्या आतील भाग, स्वानंद सोसायटी, गोविंद गौरव सोसायटी, संत ज्ञानेश्वर सोसायटी, नामदेव सोसायटी, लकाकी सोसायटी, अण्णाभाऊ साठे कॉलनी, शाहू कॉलनी, लक्ष्मीनगर मनपा शाळा १११ जवळच्या भागातील पाणीपुरवठा या दिवशी बंद राहणार आहे. या कामाचा परिणाम आजूबाजूच्या भागातही काही प्रमाणात होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असेही पाणीपुरवठा विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

धरणात १९.४१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या साखळी मध्ये सध्या १९.४१ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी हा पाणीसाठा सर्वसाधारणपणे दीड टीएमसी अधिक आहे. धरणांच्या एकूण क्षमतेच्या ६६.५८ टक्के हा पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. उपलब्ध पाण्यासाठी पाणी शेतीसाठी देखील सोडावे लागणार आहे. पुणे जिल्ह्यातील शेतीला आणि आजूबाजूच्या गावांना धरणातून उन्हाळी आवर्तनासाठी नक्की किती पाणी सोडायचे याबाबतचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीनंतर होणार आहे.