पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी (१४ नोव्हेंबर) रात्री हाणामारी झाल्याची घटना घडली. येरवड्यातील संगमवाडी भागात ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाद मिटविला. कार्यकर्त्यांनी आपसात चर्चा करून वाद मिटविल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली.
येरवड्यातील संगमवाडी गावठाणात गुरुवारी रात्री सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले. संगमवाडी गावातूील फेरी झाल्यानंतर शिरोळे हे कार्यकर्त्यांची भेट घेत होते. रात्री साडेनऊच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी सुरु झाली. एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संगमवाडीत धाव घेतली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी तक्रारी द्याव्यात, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आपसात चर्चा करुन वाद मिटविला, अशी माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.