मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पी. ए. बोलतो आहे असं सांगत पुण्यातल्या ससून रूग्णालयाच्या डीनना फेक कॉल करण्यात आला आहे. ही माहिती काही वेळापूर्वीच समोर आली आहे. ससूनमध्ये सुरू असलेल्या मेसचे दुसरे टेंडर भरा असा आदेश देणारा हा फोन होता. ससून रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना लँडलाईनवर हा फोन आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डीन संजीव ठाकूर यांचा थेट सीएमओला कॉल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पी. ए. बोलतो आहे, असं सांगून फोन करणारी व्यक्ती तब्बल पाच मिनिटे बोलत होती. त्या व्यक्तीने डीन यांच्याकडून सर्व माहिती घेतली आणि डीन यांना अनेक सूचनाही केल्या. मात्र काही वेळानंतर डीन संजीव ठाकूर यांना फोनबाबत संशय आला. त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकाराची खात्री करण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयात फोन केला. हा फोन केल्यानंतर ठाकूर यांना समजलं की आपल्याला आलेला फोन कॉल बनावट होता.

पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार नाही

संजीव ठाकूर यांनी सांगितलं आहे की फेक फोन कॉल येण्यापूर्वीच काही तास आधी कँटीन समितीची बैठक घेतली होती. कँटीनच्या निविदेची मुदत संपल्याने ती बंद करणार असल्याविषयी त्यात चर्चा झाली होती. त्यानंतर फेक कॉलही नेमका याच संदर्भात आला होता. डॉ. संजीव ठाकूर यांनी अत्यंत हुशारीने हा सगळा प्रकार समोर आणला. या संपूर्ण फेक कॉल प्रकरणाची माहिती संजीव ठाकूर यांनी पोलिसांना दिली नाही. कारण या प्रकरणात वेळ घालवण्यापेक्षा आज ज्या नियोजित शस्त्रक्रिया आहेत त्या जास्त महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पोलिसांना या संदर्भात माहिती दिलेली नाही असं संजीव ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याशी संपर्क साधला असता ही बाब आमच्याही निदर्शनास आली आहे. बोगस व्यक्तीने कॉल केला असल्याचे समजते आहे अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे असं मंगेश चिवटे यांनी म्हटलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune sasoon hospital fake call to dean dr sanjeev thakur scj