पुणे : ससून रुग्णालयात आगामी काळात रुग्णसेवा केंद्रस्थानी ठेवून काम करणार आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी संशोधनाचे पूरक वातावरण निर्णाण करण्यावर भर दिला जाईल, अशी भूमिका नवीन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी मांडली. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त कार्यभार बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. म्हस्के यांनी गुरुवारी ससूनच्या अधिष्ठातापदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. म्हस्के म्हणाले की, ससून रुग्णालयात रुग्णांना योग्य आणि वेळेत उपचार मिळावेत, याला प्राधान्य दिले जाणार आहे. रुग्णांना सेवा मिळण्यात काही अडचणी येत असतील तर त्या सोडविण्यात येतील. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रुग्णसेवेवर काही परिणाम होत असल्याचे दिसत आहे. त्यावरही तातडीने उपाययोजना केल्या जातील. सध्या बाह्यरुग्ण विभागाचे नूतनीकरण सुरू असल्याने तिथे रुग्णांना रांगा लावाव्या लागत आहेत. तिथे रुग्णांची बसण्याची व्यवस्था करण्याबाबत पावले उचलली जातील. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना रुग्णालयात आल्यानंतर माहिती मिळावी, यासाठी चौकशी कक्ष स्थापन करण्यात येईल.

हेही वाचा : ससूनमधील रक्ताच्या नमुन्यांचे गौडबंगाल अखेर उघड! चौकशी समितीच्या अहवालात मोठा खुलासा

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांसाठी संशोधनपूरक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाईल. महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडेल, असे काम सर्वांनी मिळून करावे, असा माझा प्रयत्न राहील.

डॉ. चंद्रकांत म्हस्के, अधिष्ठाता, ससून रुग्णालय
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune sassoon hospital dean dr chandrakant mhaske treatment of patients is top priority pune print news stj 05 css