पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात आरोपीच्या रक्ताची अदलाबदल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या समितीने आपत्कालीन विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना न्यायवैद्यक प्रकरणांची हाताळणी करण्याचे प्रशिक्षण देण्याची शिफारस केली आहे. यानुसार रुग्णालय प्रशासन लवकरच पावले उचलणार आहे.
ससूनमधील रक्त अदलाबदल प्रकरणामुळे रुग्णालयाची प्रतिमा खराब झाली आहे. या प्रकरणी रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.अजय तावरे आणि आपत्कालीन विभागातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीहरी हाळनोर यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे न्यायवैद्यक प्रकरणात होणाऱ्या वैद्यकीय तपासणीचा मुद्दा समोर आला आहे. त्यादृष्टीने रुग्णालय प्रशासन आगामी काळात पावले उचलणार आहे.
हेही वाचा : रेल्वे प्रवाशांनो सावधान! दररोज आठ हजार फुकट्यांवर कारवाईचा दंडुका; अडीच कोटी रुपये वसूल
या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने न्यायवैद्यक प्रकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण आपत्कालीन विभागातील डॉक्टरांना द्यावे, अशी शिफारस केली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना न्यायवैद्यक प्रकरणे (एमएलसी) हाताळण्यासाठी प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, असे समितीने अहवालात म्हटले आहे. याचबरोबर विविध प्रकरणांमधील आरोपींची वैद्यकीय तपासणी आणि त्याबाबतच्या कागपत्रांच्या नोंदी ठेवण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही डॉक्टरांना देण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.
विविध प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येते. या आरोपींनी मद्य किंवा अमली पदार्थांचे सेवन केले असल्यास त्याची योग्य पद्धतीने तपासणी होणे गरजेचे आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने घेताना नियमनांचे पालन झाले नाही. अमली पदार्थ सेवनाची शक्यता असल्याने रक्तासह लघवी तपासणी करणे आवश्यक होते, असे चौकशी समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा : आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू… राज्यात जागा किती, अर्ज भरण्यासाठी मुदत किती?
दरमहा सहाशे आरोपींची तपासणी
ससून रुग्णालयात दर महिन्याला न्यायवैद्यक प्रकरणातील सहाशे आरोपींची तपासणी केली जाते. म्हणजेच दररोज २० आरोपींची ससूनमध्ये तपासणी होते. पुणे जिल्ह्यात सर्वांधिक आरोपींची तपासणी ससूनमध्ये होते. इतर सरकारी रुग्णालयात हे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे ससूनवरील आरोपींच्या तपासणीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे.