पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात सध्या रक्तटंचाई आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून रक्त पिशव्या आणाव्या लागत आहेत. अशा स्थितीत शहराच्या मध्यवर्ती भागातील रक्तदान शिबिराचे निमंत्रण ससूनला आले. परंतु, शिबिराच्या ठिकाणी जायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला. कारण रुग्णवाहिकेत डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याची बाब समोर आली. अखेर यावरून गदारोळ झाल्यानंतर रुग्णवाहिकेत डिझेल भरण्यासाठी प्रशासनाने पैसे उपलब्ध करून दिले.
ससून रुग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्ताचा पुरेसा साठा नाही. रक्तपेढीत रक्ताच्या केवळ ८३ पिशव्या आज सायंकाळपर्यंत होत्या. रुग्णालयाचा विचार करता तेथील रुग्णांनाच दररोज ७० ते ८० रक्ताच्या पिशव्या लागतात. त्यामुळे सध्या रुग्णालयातील रक्तपेढीत केवळ एक दिवसाचा रक्तसाठा शिल्लक आहे. सर्वसाधारणपणे रक्तपेढीत चार ते पाच दिवसांसाठी पुरेल एवढा साठा ठेवावा लागतो. रुग्णालयात रक्तटंचाई असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरील रक्तपेढ्यांतून रक्ताच्या पिशव्या आणाव्या लागत आहेत.
हेही वाचा : महिला नवउद्यमींसाठी राज्य सरकारची योजना… पात्रता काय, किती रक्कम मिळणार?
शहरातील एका संस्थेने मंगळवारी (ता. १५) एक रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात ससूनसह चार रक्तपेढ्यांना बोलाविण्यात आले आहे. या शिबिरात सुमारे ३५० रक्तपिशव्यांचे संकलन होते. त्यांचे समान वाटप चारही रक्तपेढ्यांत करण्यात येते. त्यामुळे या शिबिरातून ससूनला एक दिवसाचा रक्तसाठा उपलब्ध होणार होता. परंतु, शिबिरात रुग्णवाहिका घेऊन जाण्यासाठी तिच्यात डिझेल नसल्याचा मुद्दा सोमवारी सायंकाळी उपस्थित झाला. ससूनपासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर गुरुवार पेठेत रक्तदान शिबिर असूनही केवळ डिझेल नसल्याने त्यावर पाणी सोडण्याची वेळ आली. अखेर यावर गोंधळ झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने डिझेलसाठी पैसे उपलब्ध करून दिले.
ऐनवेळी धावाधाव का?
ससून रुग्णालयातील वाहनांमध्ये डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंप निश्चित केलेला असतो. या पेट्रोल पंपाचे पैसे थकविल्यास त्यांच्याकडून डिझेल पुरवठा बंद केला जातो. या परिस्थितीत रक्तपेढीतील अधिकारी त्यांच्याकडील रक्कम डिझेलसाठी देतात. नंतर देयके सादर करून प्रशासनाकडून हे पैसे घेतले जातात. रुग्णालयात सोमवारी मात्र डिझेलचे पैसे कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला. अखेर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांपर्यंत हे प्रकरण पोहोचले. त्यांनी हस्तक्षेप करून डिझेलसाठी पैसे उपलब्ध करून दिले. मात्र, ऐनवेळी डिझेलसाठी धावाधाव का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा : पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालकांनी मागविला
रुग्णवाहिकेत डिझेल भरण्यासाठी आगाऊ पैसे स्वीकारण्यास चालकाने नकार दिला होता. याप्रकरणी मार्ग काढण्यात आला आहे. रुग्णवाहिकेतील डिझेलचा प्रश्न सुटला आहे.
डॉ. यल्लाप्पा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून सर्वोपचार रुग्णालय