सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने (एनएसएस) संलग्न महाविद्यालयांना त्यांच्या एनएसएस विभागाचे समाजमाध्यमात खाते सुरू करून उपक्रमांच्या प्रचार प्रसाराचे निर्देश दिले. मात्र संलग्न महाविद्यालयांना निर्देश देणाऱ्या विद्यापीठाच्या एनएसएस विभागाचे खाते वगळता विद्यापीठाचे स्वतःचे समाजमाध्यमांत अधिकृत खाते नसल्याचा विरोधाभास आहे. विद्यापीठाने समाजमाध्यमात सक्रिय होण्याबाबत अधिसभेत वेळोवेळी मागणी, ठराव मांडूनही विद्यापीठाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून, विद्यापीठाला समाजमाध्यमांचे वावडे असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा >>> पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण
विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी काही दिवसांपूर्वी परिपत्रक प्रसिद्ध केले होते. त्यानुसार संलग्न महाविद्यालयांनी विविध समाजमाध्यमांमध्ये खाते सुरू करून उपक्रमांचा प्रचार-प्रसार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने समाजमाध्यमांत खाते सुरू केले. त्यातही या विभागाच्या नावाने वेगवेगळी खाती असल्याचे दिसून येत आहे. मात्र विद्यापीठाचे स्वतःचे टेलिग्रामवरील खाते वगळता अन्य कोणत्याही समाजमाध्यमांत अधिकृत खाते अस्तित्वात नाही. विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांकडून विद्यापीठाने समाजमाध्यमांत सक्रिय होण्याबाबत, विद्यार्थ्यांच्या समस्या समाजमाध्यमांद्वारे जाणून घेऊन त्या सोडवण्याबाबतची कार्यवाही करण्यासंदर्भातील ठराव वेळोवेळी अधिसभेत मांडण्यात आले. या ठरावांबाबत अधिसभेत चर्चाही झाली होती. मात्र आतापर्यंत विद्यापीठाने समाजमाध्यमांत सक्रिय न होण्याचीच भूमिका घेतली आहे.
हेही वाचा >>> पुणे : विद्यापीठातर्फे ६ नोव्हेंबरला पीएच.डी. प्रवेश परीक्षा
ट्विटरवर विद्यापीठाचे नाव आणि बोधचिन्ह वापरण्यात आलेली तीन खाती आहेत. या अनधिकृत खात्यांबाबत विद्यापीठ अनभिज्ञ आहे. या संदर्भात ‘लोकसत्ता’ने २०२०मध्ये वृत्तही दिले होते. त्या वेळी अनधिकृत असलेली ट्विटर खाती विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून हटवण्यात येतील असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात ही खाती हटवण्याबाबत विद्यापीठाकडून अद्याप कार्यवाही करण्यात आली नसल्याचे दिसून येते. केंद्र, राज्य सरकार समाजमाध्यमांमध्ये सक्रिय असताना विद्यापीठाला समाजमाध्यमांचे वावडे का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.
समाजमाध्यमांसंदर्भात विद्यापीठाने धोरण ठरवले आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठीची व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे.- डॉ. संजीव सोनावणे, प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ