पुणे म्हटल्यानंतर चटकन डोळय़ांसमोर येते ते कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी ही ग्रामदैवते, तळय़ातला गणपती, गुंडाचा गणपती, दशभुजा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ही मंदिरे. जीवनाचे कोणतेही क्षेत्र घ्या किंवा कोणताही विषय, त्यातील तज्ज्ञ पुण्यात नाहीत असे होतच नाही. अभिजात शास्त्रीय संगीताचे शिक्षण, जतन आणि संवर्धन करण्यामध्ये पुणे भारत गायन समाज, गांधर्व महाविद्यालय आणि गोपाळ गायन समाज यांसारख्या संस्थांसह अनेक छोटय़ामोठय़ा संस्था कार्यरत आहेत. ‘पुणे तिथे काय उणे’ असे म्हटले जाते ते उगाच नाही. याची प्रचिती गेल्या सहा दशकांपासून पुण्यात सुरू असलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या माध्यमातून रसिकांना येत असते. आपल्या गुरूचे स्मारक उभारण्याच्या उद्देशातून स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांनी सुरू केलेला हा गानयज्ञ गेली ६३ वर्षे संगीतप्रेमींना श्रवणानंदाची परमोच्च अनुभूती देत आहे. गायन-वादन आणि नृत्य असा संगीताचा त्रिवेणी संगम घडविणारा, देशातील विविध संगीत घराण्यांच्या कलाकारांना बहुमान मिळवून देणारा आणि जगभरातील संगीतप्रेमींना आकर्षित करणारा हा महोत्सव म्हणजे विद्येचे माहेरघर असलेल्या सांस्कृतिक पुण्याचे केवळ भूषणच नाही, तर पुण्याच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा ‘ब्रँड’च झाला आहे. कोणत्याही कलाकाराला ‘सवाई’च्या स्वरमंचावरून कलाविष्कार सादर करण्यामध्ये जीवनाची सार्थकता वाटते यामध्येच या महोत्सवाच्या यशाचे गमक सामावले आहे.

भारतीय अभिजात संगीताचा उत्कर्ष करण्यामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या गेल्या शतकातील कलाकारांमध्ये सवाई गंधर्व म्हणजेच रामभाऊ कुंदगोळकर हे एक मोलाचे नाव आहे. त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्याच्या उद्देशातून सवाई गंधर्व यांचे शिष्योत्तम पं. भीमसेन जोशी आणि जामात डॉ. वसंतराव ऊर्फ नानासाहेब देशपांडे यांच्या पुढाकाराने १९५२ मध्ये पहिला महोत्सव झाला. पुण्यतिथी स्वरूपात झालेल्या या उत्सवामध्ये गुरुचरणी गानसेवा रुजू करणे या हेतूने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे पाहता पाहता एका भव्य महोत्सवामध्ये रूपांतर झाले. प्रारंभी आप्पा बळवंत चौकातील लक्ष्मी क्रीडा मंदिर येथे होणारा हा महोत्सव रेणुका स्वरूप हायस्कूल, नूमवि प्रशाला अशी त्रिस्थळी वाटचाल करून शनिवार पेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर स्थिरावला. मध्यंतरी एक वर्ष गणेश कला क्रीडा मंच येथेही हा महोत्सव झाला होता. मात्र, हे स्थळ पुणेकरांच्या पचनी पडले नसल्याने महोत्सवाची पालखी पुन्हा एकदा रमणबाग प्रशालेच्या मैदानावरच विसावली. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर या महोत्सवाच्या नावामध्ये त्यांच्याही नावाचा समावेश करण्यात आला. आता ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ या नावाने तो लोकप्रिय झाला आहे.

संगीत ही काही कोणत्या धर्माची, प्रांताची किंवा भाषक समूहाची मालमत्ता असत नाही. स्वरांना लाभलेला आत्मानुभूतीचा साक्षात्कार आणि सर्जनशीलता यातून संगीत ही कला केवळ फुलली वा बहरली नाही, तर कलाकाराला समाधान आणि रसिकांना आनंद देणारी झाली. या आनंदाचे वाटप करीत माणसाला सुसंस्कृत बनविण्याच्या उद्देशातून भारतामध्ये अभिजात संगीताच्या वृद्धीसाठी वर्षांनुवर्षे होत असलेल्या संगीत महोत्सवांचे महत्त्व फार मोलाचे आहे. कोलकात्यातील डोबरलेन महोत्सव, जालंधरचा हरवल्लभ मेळा, भोपाळचा तानसेन महोत्सव असो, की पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, या साऱ्या संगीत सभांमधून भारतीय रसिक गेली अनेक दशके आपली अभिजात संगीताची भूक भागविण्याबरोबरच संगीत कलेची जाण वर्धिष्णू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  अभिजात संगीत ही जाता जाता करण्यासारखी गोष्ट नाही. त्याकडे डोळसपणे आणि समंजसपणे पाहिले पाहिजे एवढे ज्ञान पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला दरवर्षी न चुकता हजेरी लावणाऱ्यांना आले आहे.

कलाकाराबद्दलची माहिती, तो सादर करणार असलेल्या रागाबद्दल आणि त्यातील बंदिशीबद्दलची सविस्तर माहिती देणे हे ‘सवाई स्वरोत्सवा’मध्ये अगदी न चुकता होते. त्याचा परिणाम म्हणजे गाणे ऐकताना राग न कळल्यामुळे येणारी अस्वस्थता या महोत्सवाच्या मंडपात दिसत नाही. उलट नंतर पुन्हा कधीतरी तोच राग वेगळय़ा कलाकाराकडून ऐकताना ‘सवाई’मधील त्या मैफलीची हटकून आठवण होते. अशा कितीतरी कलाकारांचे स्वरदर्शन गेल्या सहा दशकांत महोत्सवाच्या स्वरमंचावरून झाले. हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, पं. संगमेश्वर गुरव, गंगुबाई हनगळ, पं. फिरोज दस्तूर, पं. भीमसेन जोशी यांच्यासारखे सवाई गंधर्वाचा वारसा पुढे नेणारे कलाकार रसिकांचे कान तृप्त करीत राहिले. त्याचप्रमाणे कितीतरी नावे या महोत्सवामुळे रसिकांच्या जवळची झाली. हे कलाकार एका धर्माचे नसले तरी आपापल्या घराण्याशी निष्ठा बाळगणारे आहेत. केवळ किराणा घराण्याची पताका फडकत राहावी यापेक्षाही शास्त्रीय संगीताला नवनवे रसिक लाभावेत, त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण व्हावे आणि जीवनातील सर्वोच्च आनंद म्हणजे काय याची थोडीशी तरी जाणीव व्हावी असा उदात्त हेतू या महोत्सवाच्या संयोजनात सातत्याने ठेवला जातो. त्यामुळेच हा महोत्सव साऱ्या भारतवासीयांना सतत काहीतरी नवे देऊ शकला. अभिजात संगीतातील बदलांना टिपत टिपत त्याची ओळख करून देत रसिक घडविणारे ते एक मुक्त विद्यापीठच झाले आहे.  डिसेंबर महिना आणि गुलाबी थंडी ही जणू सवाई गंधर्व महोत्सव सुरू होण्याच्या आगमनाची नांदीच असते. साऱ्या भारताचे भूषण असलेल्या पुण्यातील सवाई गंधर्व संगीत महोत्सवाने श्रवणभक्तीचे सुख घेणाऱ्या रसिकांना स्वरांची कवचकुंडले दिली आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे अभिजात संगीताला नवसंजीवनी दिली.

शास्त्रीय संगीत म्हटल्यावर अनेक जण दूरच राहणे पसंत करीत असतात. मात्र, पुण्यात हे चित्र उलट दिसते. येथील रसिक डिसेंबरच्या थंडीत स्वेटर आणि शाल पांघरून हा स्वरोत्सव अनुभवताना दिसतात. रात्री दहानंतर ध्वनिवर्धकावर बंदी घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या महोत्सवाचे स्वरूपही बदलले. स्वरांच्या दुनियेत तीन रात्री चिंब भिजविणारा हा महोत्सव चार दिवस आणि पाच सत्रांत होऊ लागला. मात्र, रसिकांचे या महोत्सवावरील प्रेम अलोट आणि अतूट राहिले. ही अभिजात संगीताची आणि पं. भीमसेन जोशी यांच्या सांगीतिक कर्तृत्वाच्या पुण्याईची गोष्टच म्हणावी लागेल. श्रद्धा, निष्ठा आणि गुरुभक्ती याचे परमोच्च प्रतीक असलेला हा महोत्सव पुणेकरांच्याच गळय़ातील ताईत झाला असे नाही तर तो पुण्याचे भूषण झाला आहे. पाश्चात्त्य संगीतामध्ये ‘बँड’ आहेत. मात्र, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा अभिजात संगीताचा ‘ब्रँड’ झाला आहे यामध्ये तीळमात्र शंका नाही.

Story img Loader