पुणे : शाळकरी मुलींवर अत्याचार प्रकरणात जप्त केलेल्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह नऊजणांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गाडीची तोडफोड केली होती.

याप्रकरणी वंचित बहुजन आघाडी माथाडी कामगार अध्यक्ष विशाल कसबे, धर्मराज यादव लांडगे, मिलिंद हरिदास सरवदे, विशाल वंजारी, सचिन भडकवाड यांच्यासह नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यातील हवालदार जोतिबा कुरळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकाकडून सहा वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी संजय जेटींग रेड्डी (वय ४५, रा. वैदूवाडी, हडपसर) याला अटक करण्यात आली.

हेही वाचा : पिंपरी : चिंचवडची जागा न मिळाल्यास महाविकास आघाडीत प्रवेश; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचा अजितदादांना इशारा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील दाखल गुन्ह्यातील गाडी जप्त करून सुरक्षित ठिकाणी आणण्यात आली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक करून नुकसान केले. हडपसर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.