पुणे : दक्षिण कोरियात नृत्य शिकण्यासाठी विश्रांतवाडी भागातील दोन शाळकरी मुली घरातून पळाल्या. मुली बेपत्ता झाल्यानंतर मुलींच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. विश्रांतवाडी पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने पळालेल्या दोन मुलींना सुखरुप घरी आणून पालकांच्या ताब्यात दिले. विश्रांतवाडी भागातील एका शाळेत मुली आठवीत आहेत. दोघी विश्रांतवाडीतील धानोरी आणि टिंगरेनगर भागात राहायला आहेत. दोघींना नृत्याचा छंद आहे. त्यांनी नृत्याचे प्रशिक्षणही घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजमाध्यमातील एका ध्वनिचित्रफितीतून त्यांना दक्षिण कोरियातील एका नृत्य संस्थेची माहिती मिळाली होती. एका मुलीच्या आजीने तिला औषध आणण्यासाठी पाचशे रुपये दिले. ओैषधे खरेदी न करता मुलगी तिच्या मैत्रिणीकडे गेली. मैत्रिणीकडे तिने अभ्यास केला. त्यानंतर दोघी बहाणा करुन घरातून बेपत्ता झाल्या. दोघी पुणे रेल्वे स्थानकावर आल्या. रेल्वेने दोघी मुंबईतील दादर स्थानकावर उतरल्या. दरम्यान, एका मुलीच्या आजीने पोलिसांकडे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. आजीच्या मोबाइल क्रमांकावर एका टॅक्सीचालकाने संपर्क साधला. पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला.

हेही वाचा : कुमार कोशाच्या नोंदी संकेतस्थळावर प्रसारित…मुद्रित स्वरूपातील भाग लवकरच वाचकांच्या भेटीला

टॅक्सीचालकाशी पोलिसांनी संपर्क साधला, तेव्हा टॅक्सीचालकाने पुण्यातील दोन शाळकरी मुली मुंबईत आल्याची माहिती दिली. टॅक्सीचालकाला पोलिसांनी मुली घरातून पळाल्याची माहिती दिली. टॅक्सीचालकाने घटनेचे गांभीर्य ओळखले. टॅक्सीचालकाने दोन मुलींचा शोध‌ घेतला. तेव्हा त्या दादर परिसरात फिरत होत्या. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक अन्सार शेख यांनी मुंबईतील माटुंगा पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील पथक मुंबईकडे रवाना झाले. दोघींना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांचे पथक पुण्यात आले. मुलींना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा : पावसाचे पुनरागमन… पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये जोरदार पाऊस

टॅक्सीचालकाची तत्परता

शाळकरी मुली नृत्य शिकण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. दक्षिण कोरियात त्यांना नृत्य शिकायला जायचे होते. मुंबईतील दादर परिसरात दोघी रेल्वेने आल्या. टॅक्सीचालकाने दोन मुलींना पाहिले. त्या गोंधळलेल्या होत्या. दोघी घरातून पळून आल्या होत्या. टॅक्सीचालकाने ही बाब हेरली आणि त्वरित पोलिसांशी संपर्क साधला, असे सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune school girls ran away from home to learn dance at south korea pune print news rbk 25 css
Show comments