पुणे : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) राज्यातील सर्व शाळांसाठी नुकतेच वार्षिक परीक्षा आणि नियतकालिक मूल्यमापन चाचणीचे (पॅट) वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळानेही राज्यातील शाळांना मार्गदर्शनपर वेळापत्रक तयार करून दिले आहे. परीक्षांसाठी दोन स्वतंत्र वेळापत्रके तयार झाल्याने आता नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
शाळांतील परीक्षा दर वर्षी १५ एप्रिलपर्यंत संपत होत्या. मात्र, एससीईआरटीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २५ एप्रिलपर्यंत शाळा सुरू राहणार आहेत. उन्हाळा, पाण्याची टंचाई, उत्तरपत्रिका तपासणीला वेळ न मिळणे अशा कारणांमुळे शिक्षक, मुख्याध्यापकांचा या वेळापत्रकावर आक्षेप होता. मात्र, ‘एससीईआरटी’ने वेळापत्रकात बदल केला नाही. या पार्श्वभूमीवर, मुख्याध्यापक महामंडळाने शाळांसाठी मार्गदर्शनपर वेळापत्रक तयार केले आहे. या वेळापत्रकानुसार ३ ते २३ एप्रिल या कालावधीत या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने म्हणाले, ‘एससीईआरटीने दिलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी मुख्याध्यापक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार यांची भेट घेऊन चर्चा करून, निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या. तसेच वेळापत्रकात बदल करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. तीन-चार दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, वेळापत्रकात अद्याप बदल करण्यात आला नाही. पॅट परीक्षा केवळ शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांमध्येच घेतली जाते. स्वयंअर्थसहाय्यित, विनाअनुदानित, टप्पा अनुदानित शाळांना या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका दिल्या जात नाहीत. एमईपीएस कायद्यानुसार खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये परीक्षा घेणे निकाल लावणे ही शाळाची आणि मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे. त्यामुळे मुख्याध्यापक महामंडळाने चर्चा करून मार्गदर्शनपर वेळापत्रक तयार करून दिले आहे. पॅट परीक्षा एससीईआरटीकडून घेतली जात असल्याने पॅट परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे शाळास्तरावरील परीक्षा शाळांना मुख्याध्यापक महामंडळाच्या मार्गदर्शनपर वेळापत्रकानुसार परीक्षा घेता येतील.’