भरधाव एसटी बस चालवून नऊ जणांचा जीव घेणाऱया संतोष मानेची फाशीची शिक्षा पुणे सत्र न्यायालयाने बुधवारी कायम केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी हा निकाल दिला.
स्वारगेट एसटी स्थानकातून बस चोरून भरधाव चालवत नऊ जणांचा बळी घेतल्याप्रकरणी संतोष मानेला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. माने याने या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर शिक्षेवर म्हणणे मांडण्यास सत्र न्यायालयात वेळ दिला नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील धनंजय माने यांनी केला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाने मानेची फाशीची शिक्षा रद्द करून त्याचा जबाब घेण्यासाठी हा खटला परत सत्र न्यायालयाकडे पाठविला होता. सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होताच धनंजय माने यांनी संतोष माने हा जबाब देण्यासाठी मानसिकदृष्टय़ा सक्षम आहे का, याची तपासणी करावी आणि त्यानंतर त्याचा जबाब नोंदवा, अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने येरवडा मनोरुग्णालयास मानेची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. येरवडा मनोरुग्णालयाच्या तीन डॉक्टरांच्या पॅनलने मानेची तपासणी करून तो मानसिक रुग्ण नसल्याचा अहवाल दिला होता.
या प्रकरणी २० नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी संतोष मानेला न्यायालयाने काही प्रश्न विचारले. शिक्षेसंदर्भात काही बाजू मांडायची आहे का, बचावासाठी काही पुरावे न्यायालयासमोर द्यायचे आहेत का, असे काही प्रश्न विचारण्यात आले. मात्र, मानेने त्या प्रश्नाला उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर न्यायालयाने धनंजय माने यांना शिक्षेसंदर्भात काही म्हणणे सादर करायचे आहे, अशी विचारणा केली. त्या वेळी धनंजय माने यांनी आरोपीला काही समजत नसल्याचे नमूद करत शिक्षेसंदर्भात सांगण्यासाठी मुदत देण्याची मागणी केली होती.
संतोष मानेची फाशी सत्र न्यायालयाकडून कायम
भरधाव एसटी बस चालवून नऊ जणांचा जीव घेणाऱया संतोष मानेची फाशीची शिक्षा पुणे सत्र न्यायालयाने बुधवारी कायम केली.
First published on: 11-12-2013 at 01:49 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune session court confirms death sentence to santosh mane