पुणे : तळवडे येथे गवताच्या आगीत महावितरणच्या २२ केव्ही आणि ३३ केव्ही क्षमतेच्या सात वीजवाहिन्या जळाल्याने तळवडे पाणीपुरवठा योजनेसह तळवडे एमआयडीसी आणि औद्योगिक परिसरातील सुमारे साडेचार हजार औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा मंगळवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास खंडित झाला. यातील सुमारे १८०० उद्योगांना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर, उर्वरित २७०० उद्योगांसह पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा युद्धपातळीवर काम करून रात्री पूर्ववत करण्यात आला.

दरम्यान, या आगीमुळे देहूगाव, चिंचोली गावातील अडीच हजार घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. मात्र, पर्यायी व्यवस्थेतून सायंकाळी सहा वाजेपर्यंत या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. आगीमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा गेल्या दोन महिन्यांतील हा नववा प्रकार आहे.

तळवडे येथील डोंगरावरील वाळलेल्या गवताला मंगळवारी दुपारच्या सुमारास आग लागली. ही आग सर्वत्र पसरत गेली. डोंगराशेजारी असलेल्या एका ओढ्याच्या कडेपर्यंत ही आग आली. त्याच ठिकाणी असलेल्या महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या चार आणि ३३ केव्ही क्षमतेच्या तीन वीजवाहिन्या या आगीत जळाल्या. त्यामुळे तळवडे एमआयडीसी, औद्योगिक परिसर तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तळवडे पाणीपुरवठा योजनेसह सुमारे साडेचार हजार लघु आणि उच्चदाब औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. या सर्व परिसराला नियमित वीजपुरवठा करणाऱ्या चार आणि पर्यायी वीजपुरवठ्यासाठी अतिरिक्त असलेल्या तीन वीजवाहिन्या जळाल्या. त्यामुळे वीजपुरवठ्याची पर्यायी सोय उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र इतर पर्यायी व्यवस्थेतून सुमारे १८०० औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा दोन तासांमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला.

भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी तीन कंत्राटदार आणि सहा जॉईंटर यांना पाचारण करून एकाचवेळी सर्व वीजवाहिन्यांचे दुरुस्ती काम सुरू केले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण सरोदे, सहायक अभियंता ऋषिकेश बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन या कामाला वेग दिला. रात्री दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित २७०० औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला.