विद्येचे माहेरघर असलेले पुणे गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठीचेही केंद्र झाले आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या अनुषंगाने विकसित झालेल्या उद्योग क्षेत्रात आता अभ्यासिका या नव्या व्यवसायाची भर पडली आहे. मात्र, शहराच्या विविध भागांतील सदनिका, जुने वाडे, गाळे, पार्किंग अशा कुठेही या अभ्यासिका सुरू करण्याचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षार्थी या अभ्यासिकांचा वापर करत असून, या अभ्यासिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. महापालिकेने तत्काळ शहरात एकूण अभ्यासिका किती, त्या नियमानुसार आहेत का या बाबत काटेकोर तपासणी करून त्यांची माहिती जाहीर करणे, त्यासह त्यांचे सुरक्षात्मक लेखापरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गांजवे चौक परिसरातील अभ्यासिकेला आग लागून अभ्यासिकेतील लॅपटॉप, पुस्तके, खुर्च्या आदी साहित्य जळून खाक झाल्याची घटना शनिवारी घडली. त्यापूर्वी दिल्ली येथे अभ्यासिकेत पाणी घुसल्याने स्पर्धा परीक्षार्थ्यांचा मृत्यू झाला होता. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, शहरातील स्पर्धा परीक्षांचे खासगी शिकवणी वर्ग, अभ्यासिकांचा मुद्दा गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. शिक्षणासाठी पूर्वीपासूनच ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आता स्पर्धा परीक्षांच्या खासगी शिकवणी वर्गांची एक वेगळी अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. शिकवणी वर्ग, त्याची पुस्तके तयार करणे, छपाई, छायांकित प्रति, शिकवणी वर्गातील शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी, शुल्क अशा कोट्यवधींची उलाढाल त्यातून होते. या उद्योगातून अनेकांना रोजगारही मिळाला आहे. त्यात अभ्यासिकांचीही भर पडली आहे.
सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून राज्याच्या कानाकोपऱ्यातून तरुण-तरुणी पुण्यात येतात. शहरातील मध्यवर्ती पेठा, उपनगरांमध्ये राहून खासगी शिकवणी वर्ग, अभ्यासिकांमध्ये अभ्यास करतात. मध्यवर्ती पेठा आणि उपनगरांमध्ये मिळून पाचशे ते सहाशेपेक्षा जास्त अभ्यासिका असल्याचे स्पर्धा परीक्षा क्षेत्रांतील जाणकार सांगतात. शॉप ॲक्टसारखा परवाना मिळवून अभ्यासिका सुरू केली जाते. बहुतांशी जागा भाड्याने घेऊन अभ्यासिका सुरू केली जाते. स्पर्धा परीक्षार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी शांत वातावरण उपलब्ध करून देण्यासह बसण्यासाठी टेबल-खुर्ची, वायफाय, स्वच्छतागृह, पुस्तके, पिण्याचे पाणी अशा सुविधा पुरवल्या जातात. त्यासाठी दीड हजार-दोन हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. स्पर्धा परीक्षार्थी मध्यवर्ती पेठा, उपनगरांतील सदनिका, वसतिगृहांमध्ये दाटीवाटीने राहत असल्याने त्यांना अभ्यासासाठी हवी असलेली शांतता अनेकदा मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासिकांना पसंती देतात. अर्थात, अभ्यासिकेचे शुल्क न परडवणारे विद्यार्थी रात्री इमारतींच्या व्हरांड्यांत बसून अभ्यास करताना दिसतात.
छोट्या सदनिका, गाळे, जुने वाडे, पार्किंगमध्ये सुरू केलेल्या अभ्यासिकांमध्ये बरीच गर्दी असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आपत्ती ओढवल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो. विशेषत: नुकत्याच आग लागण्याच्या घटनेचा विचार करता या अभ्यासिकांमध्ये अग्निरोधक साहित्याची उपलब्धता असते का, अभ्यासिका चालक किंवा तेथील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबतची माहिती असते का, हे अगदी मुलभूत प्रश्न आहेत. अभ्यासिकांमध्ये असणारी विद्यार्थिसंख्या विचारात घेता महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व अभ्यासिकांची नोंदणी करून घेणे, त्या नियमानुसार चालवल्या जातात का, याची तपासणी करणे आत्यंतिक गरजेचे आहे. त्याशिवाय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काय करायचे याबाबतचे मार्गदर्शन करणेही गरजेचे आहे. अन्यथा, अशा घटनेत एखाद्याचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी कोणाची?
chinmay.patankar@expressindia.com