पुणे : कंबरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या सराईतासह त्याच्या साथीदाराला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, तीन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून कुख्यात गुंड चेतन लिमन उर्फ मामा टोळीतील असल्याचे समोर आले आहे.
सूरज महेंद्र नांगरे (२१) आणि साहील मनीष सोनवणे (२२, रा. दोघे. किरकटवाडी, हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वडगाव येथील कॅनॉल रोडजवळ ही कारवाई करण्यात आली. सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सुरेश जायभाय, अंमलदार तानाजी सागर, दत्ता मालुसरे, धनंजय गिरिगोसवी यांचे पथक हद्दीत गस्तीवर होते.
यादरम्यान कॅनॉल रोडजवळ दोघे संशयित थांबल्याची माहिती अंमलदार सागर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता नांगरे याच्या कंबरेला पिस्तूल आढळून आले. तर, सोनवणे याच्याकडे दोन काडतुसे मिळून आली. पथकाने दोघांना अटक करून पिस्तूल जप्त केले आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.