देशातील प्रगतिशील शहरांना चालना देण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने शंभर स्मार्ट सिटीच्या उभारणीची घोषणा केली असल्याने या स्मार्ट सिटीमध्ये पुण्याचाही समावेश होण्याच्या दृष्टीने राजकारण बाजूला ठेवून प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत विविध मान्यवरांनी चर्चासत्रात व्यक्त केले. स्मार्ट सिटीसाठी पुण्याच्या स्पर्धेत देशातील ४४ शहरे असल्याने आपल्याला मोठे प्रयत्न करावे लागतील, असेही या वेळी सांगण्यात आले.
सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने ‘पुणे – जागतिक स्मार्ट सिटी’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्पोरेशनचे संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी स्मार्ट सिटीची संकल्पना व त्यासाठी केंद्र शासनाने घालून दिलेले नियम आदींबाबत या चर्चासत्रात सविस्तर माहिती दिली. महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, उपमहापौर आबा बागुल आदींनी चर्चासत्रात सहभाग घेत मते नोंदविली.
महापौर म्हणाले, स्मार्ट सिटी योजनेबाबत आराखडा कसा असावा, याची माहिती अधिकारी किंवा प्रतिनिधींना नाही. त्यामुळे त्याबाबत तज्ज्ञांची मदत घेतली जाईल. स्मार्ट सिटीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची आपण तयारी करू. राजकीय गोष्टी बाजूला ठेवून विकासाच्या दृष्टीने सर्वानी हातभार लावला पाहिजे. पुण्याचे ब्रँडिंगही करण्यात येणार असून, त्याबाबत नोटिसही काढण्यात आली आहे.
शिरोळे म्हणाले, पुण्याचा स्मार्ट सिटीमध्ये समावेशासाठी पंतप्रधानांना पत्र देण्यात आले आहे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटसाठीही प्रयत्न करण्यात येत असून, त्याबाबत हिंदूुस्थान अॅन्टिबायोटिक्स कंपनीकडील जागा सुचवली आहे. पुणे हे योग्य कसे, हे पटवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. राजकीय रंग न देता निर्णय घेतल्यास शहरातील समस्या सुटू शकतील.