पुणे : पुण्यातील विविध उद्याने, पर्यटन स्थळे, महत्त्वाचे रस्ते तसेच महापालिकेच्या इमारतींमध्ये मोफत वायफाय सेवा दिली जाते. नागरिकांना त्यांची कामे करताना इंटरनेटची अडचण भासू नये यासाठी पुणे स्मार्ट सिटी कंपनीकडून ही सेवा पुरविली जाते. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणेकर नागरिकांना मोफत वायफाय सेवा देण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. शहरातील २०० ठिकाणी नागरिकांना ही सेवा मोफत मिळत आहे. गेल्या काय वर्षांपासून या सुविधेचा फायदा नागरिकांकडून घेतला जात आहे.
पुणे स्मार्ट सिटीकडून शहरातील विविध ठिकाणी दिली जाणारी मोफत ‘वाय-फाय’ सेवा मात्र आता काही दिवस बंद राहणार आहे. यामध्ये आवश्यक असलेली सुधारणा केल्यानंतर महापालिकेच्या वतीने ही सुविधा पुन्हा सुरू केली जाणार आहे. शहरातील महत्वाच्या अशा २०० ठिकाणी ही सेवा स्मार्ट सिटीकडून दिली जात होती. केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी कंपनीची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये महापालिका आयुक्त, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेते, गटनेते हे संचालक म्हणून काम करत होते. स्मार्ट सिटी प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचे हस्तांतरण महापालिकेकडे केले जात आहे.
शहरातील उद्याने, महत्त्वाचे रस्ते, महापालिका इमारत, विविध सरकारी कार्यालये, बसस्थानक, रेल्वे स्थानकांसह शहरातील वर्दळीची ठिकणे, पार्किंग अशा २०० ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मोफत वाय-फाय सुविधा पुरविली जात होती. ही सेवा वापरताना नागरिकांना येणाऱ्या समस्या तसेच तांत्रिक अडचणी सोडविण्यावर महापालिकेने भर देण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
या कारणामुळे आता सुविधा पुढील काही दिवस बंद ठेवली जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ही सुविधा सुरू केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी गणेश सोनुने यांनी दिली. शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, संभाजी उद्यान, पुणे महापालिकेची मुख्य इमारत यासह महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांना ही मोफत वायफाय सेवा मिळत होती.