पुणेरी पाट्या म्हटलं तर त्यांना कोणतीही तोड नाही. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी थेट आमदारालाचं लक्ष्य केलं आहे. जर आम्हाला टँकरनंच पाणी घ्यावं लागतंय आणि त्यासाठी लाखो रूपये खर्च करावे लागत असतील, तर आम्ही मतदान का करावं? असा सवाल पुण्यातील वडगावशेरी भागातील नागरिकांनी आपल्या आमदाराला केला आहे. यासाठी त्यांनी ‘नो वॉटर व्हाय व्होट’ बॅनर्स लावले आहेत.

पुण्यातील वडगावशेरी भागात मोठ्या अलिशान इमारतीत राहणाऱ्या नागरिकांवर पाणी प्रश्नावरून आपल्या आमदाराला जाब विचारण्याची वेळ आली आहे. यासाठी या इमारतीतील नागरिकांनी आपल्या इमारतीजवळ ‘नो वॉटर, व्हाय व्होट?’ असे बॅनर्सही लावले आहेत. परंतु हे बॅनर्स पाहून आमदारांच्या समर्थकांना ते फाडत सुरक्षारक्षकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पाण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च केल्यानंतरही टँकरद्वारे पाणी मिळवण्यासाठी लाखो रूपये खर्च करावे लागत असतील तर आम्ही मतदान का करावं असा सवाल रहिवाशांनी केला आहे.

सदर इमारतीतील नागरिकांनी एक ठराव करून ही भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये टँकरच्या संख्येत जवळपास ७५ टक्क्यांची घट झाली असून येत्या वर्षात भामा आसखेड धरणाचं पाणी पुण्यात आणून हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दरम्यान, आपल्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावाही त्यांनी फेटाळला आहे.