पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतील कंपनीतून जप्त करण्यात आलेल्या तीन हजार ७०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन प्रकरणात अमली पदार्थ विरोधी विभागाकडून (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) सोमवारी शिवाजीनगर न्यायालयात १६ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवार पेठेतील एका गुंडासह साथीदारांकडून मेफेड्रोन जप्त केले होते. तपासात गुंड आणि साथीदारांनी मेफेड्रोनचा साठा विश्रांतवाडीतील गोदामात ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कारवाई करुन साठा जप्त केला. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तपासात पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत मेफेड्रोन तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून तीन हजार ७०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. कुरुकुंभ ओैद्योगिक वसाहतीतून दिल्लीसह देशभरातील विविध शहरात मेफेड्रोन विक्रीस पाठविण्यात आले होते. कुरकुंभमधील मेफेड्रोन दिल्लीतून कुरिअरव्दारे लंडनमध्ये पाठविण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणाचा तपास ‘एनसीबी’कडे सोपविण्याचे आदेश देण्यात आले.
याप्रकरणी वैभव उर्फ पिंट्या माने, अजय अमरनाथ करोसिया, हैदर नूर शेख, भीमाजी परशुराम साबळे, युवराज बब्रुवान भुजबळ, आयुब अकबरशहा मकानदार, संदीपकुमार राजपाल बसोया, दिवेष चरणजित भुटानी, संदिप हनुमानसिंग यादव, देवेंद्र रामफुल यादव, सुनिलचंद्र बिरेंद्र बर्मन, मोहम्मद उर्फ पप्पु कुतुब कुरेशी, शोएब सईद शेख, नायजेरियन नागरिक सिनथीया उर्फ फेवॉर उगबाबं, अंकीत नारायणचंद्र दास, निशांत शशीकांत मोदी यांच्यासह १६ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.
मुख्य सूत्रधार संदीप धुनिया पसार
दिल्लीतील मुख्य अमली पदार्थ तस्कर संदीप धुनिया याच्याविरुद्ध याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर धुनिया परदेशात पसार झाल्याचे तपासात उघडकीस आले होते.