Pune Indapur Truck : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेल मालकाने जेवण देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या एका ट्रक चालकाने मद्यधुंद अवस्थेत ट्रक थेट हॉटेलमध्ये घातल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये संबंधित हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील पुणे-सोलापूर या महामार्गावर हिंगणगावच्या परिसरात एका हॉटेलवर एक ट्रक चालक रात्रीच्यावेळी जेवणासाठी थांबला. मात्र, हॉटेलच्या मालकाने हॉटेल बंद झाल्याचं कारण सांगत जेवण देण्यास नकार दिला. मात्र, याचाच राग ट्रक चालकाला आला आणि संतप्त झालेल्या ट्रक चालकाने रागाच्या भरामध्ये ट्रक थेट हॉटेलमध्ये घातला. यामध्ये हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे.

हेही वाचा : सीट पकडण्यासाठी आप्पा थेट खिडकीवर चढले, प्रवासी अन् कंडक्टर पाहतच राहिले, एसटी बसचा Video होतोय व्हायरल

एवढंच नाही तर हॉटेलच्या परिसरात जे वाहने पार्क केलेले होते, त्या वाहनांचेही ट्रक चालकाने रागाच्या भरात मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या ठिकाणी उभा असलेल्या काही दुचाकी आणि चारचाकी वाहनाला ट्रकची धडक देत नुकसान केलं. यावेळी तेथे जमलेल्या लोकांनी या सर्व घटनेचा थरार मोबाईलमध्ये कैद केला आणि व्हिडीओ सोशल व्हायरल केला.

दरम्यान, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हॉटेल आणि हॉटेलच्या बाहेर पार्क करण्यात आलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेनंतर संबंधित ट्रक चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, हॉटेलच्या मालकाने जेवण नाकारल्यामुळे रागाच्या भरात ट्रक चालकाने हे कृत्य केल्याचं सागितलं जात आहे.