पुणे : महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी बुधवारी (२६ फेब्रुवारी) पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) महत्त्वाच्या बसस्थानकांवरून विशेष बसच सोडण्यात येणार आहे. शहर तसेच उपनगरातून निळकंठेश्वर (बी.एस.एफ, सेंटर पानशेत), बनेश्वर (नसरापूर), घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) या ठिकाणी जाण्यासाठी जादा बसची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

कात्रज सर्पोद्यान येथून बनेश्वर (चेलाडी फाटा) येथे जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजेपासून २० मिनिटांच्या अंतरानुसार दोन जादा बस आणि नेहमीच्या नऊ अशा एकूण ११ बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सारोळा, कापूरहोळ, वेल्हे, वांगणीवाडी अशा विविध मार्गावरून मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. स्वारगेट मुख्य स्थानकावरून निळकंठेश्वर (बीएसएफ सेंटर पानशेत) येथे जाण्यासाठी पहाटे साडेतीन वाजेपासून १५ ते २० मिनिटांच्या अंतरानुसार १२ जादा आणि वरसगाव मार्गांवर दोन अशा एकूण १४ बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निगडी (पवळे चौक) येथून घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) येथे जाण्यासाठी पहाटे सव्वापाच वाजेपासून १० ते १५ मिनिटांच्या अंतराने कात्रज ते वडगाव मावळ, निगडी पवळे चौक, उर्सेगाव मार्गे तळेगाव, परंदवाडी, लोणावळा, कामशेत, निगडी ते टाकवे फळणे फाया या सहा मार्गावरून एकूण २४ बसचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती पीएमपी’ प्रशासनाकडून पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली.

Story img Loader