Rahul Gandhi Veer Savarkar Defamation Case : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. गांधी यांना सोमवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, ते प्रचारात व्यस्त असल्याने न्यायालयात हजर राहू शकले नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर गांधी यांना २ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लंडन येथील एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील न्यायालयात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी गांधी यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. यापूर्वी गांधी यांना विशेष न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविण्यात आले होते. संबंधित समन्स दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाऐवजी पातियाळा येथील न्यायालयात पोहोचल्याने ते पुन्हा पुण्यातील न्यायालयात पाठविण्यात आले होते. त्यानंतर गांधी यांना पुन्हा समन्स बजाविण्यात आले. त्यानुसार गांधी यांना सोमवारी (१८ नोव्हेंबर) न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

हेही वाचा : पुणे: मतदानाच्या दिवशी कडक बंदोबस्त, संवेदनशील मतदान केंद्रांत सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात

संबंधित समन्स गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. याबाबतची कागदोपत्री पोहोच सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात सादर केली. समन्स मिळाल्यानंतर गांधी न्यायालयात हजर राहिले नसल्याचे ॲड. कोल्हटकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. गांधी यांच्या वतीने ॲड. मिलिंद पवार यांनी न्यायालायत अर्ज केला. गांधी प्रचारात व्यस्त असल्याने ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. संबंधित समन्स गांधी यांच्या कार्यालयात पोहाेचले आहे, असे ॲड. पवार यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने ॲड. पवार यांच्याकडून हमीपत्र घेतले. गांधी हे २ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहतील, असे हमीपत्रात म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune special court order rahul gandhi to present in court for veer savarkar defamation case pune print news rbk 25 css