पुणे : डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात डाॅ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे, ॲड. संजीव पुनाळेकर यांची सबळ पुराव्या अभावी विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी मुक्तता केली. डाॅ. दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींवर संशय घेण्यास वाव असताना तपास अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे तपास केला नाही, तसेच तपासात निष्काळजीपणा दाखवल्यामुळे तीन आरोपींंची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे निरीक्षण नोंदवून विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी तपास अधिकाऱ्यांना सुनावले.
डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पुणे पोलिसांनी केला. त्यानंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) तपास केला. डाॅ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याची मागणी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणाचा तपास उच्च न्यायालायच्या आदेशाने सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. सीबीआयचे अधिकारी एस. आर. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास करण्यात आला.
डाॅ. दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींवर संशय घेण्यास वाव असताना तपास अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे तपास केला नाही, तसेच तपासात निष्काळजीपणा दाखवल्यामुळे आरोपी भावे, ॲड. पुनाळेकर, डाॅ. तावडे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे, असे निरीक्षण विशेष न्यायाधीश जाधव यांनी नोंदविले.
हेही वाचा : विरोधकांच्या इंजिनात कुटुंबातील व्यक्तींसाठी जागा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (युएपीए) दाखल केलेला गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही, असे जाधव यांनी नमूद केले. तपास अधिकाऱ्यांनी योग्य तपास न केल्याने तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे निरीक्षण नोंदवून अप्रत्यक्षरित्या तपास अधिकाऱ्यांच्या तपास पद्धतीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.