शहरात प्रवास करताना दुचाकी, चारचाकी, बस अथवा पायी चालताना रस्त्यांवर थुंकणे तल्लफबाजांना चांगलेच महागात पडत आहे. पुण्यात रस्त्यावर थुंकणाऱ्या विरोधात आधिकाऱ्यांनी कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. कारवाईदरम्यान रस्त्यावर थुंकणाऱ्यांना फक्त दंडाचीच नव्हे; तर थुंकी साफ करण्याची शिक्षाही देण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावर थुंकण्यापूर्वी हजारवेळा विचार करा.
पुण्यामध्ये रस्त्यावर थुंकताना पाहिल्यास संबंधित व्यक्तीला १०० रुपये दंड आकारण्यात येतो. तसंच त्याला कपडे आणि पाणी देऊन थुंकी साफ करण्याची शिक्षा देण्यात येते. स्वच्छतेबाबत जागृती आणि लोकांना स्वयंशिस्तीचे धडे देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. संपूर्ण प्रभागात ही मोहीम अशीच सुरू राहील, असं बिबवेवाडी प्रभाग अधिकारी अविनाश सकपाळ यांनी सांगितलं.
केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानातंर्गत सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, कचरा टाकणे, थुंकणे, उघड्यावर लघवी करणे, तसेच शौच करणे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी शासनाने प्रत्येक महापालिकेला आपल्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारे थुंकणे, घाण, कचरा टाकणे, उघड्यावर लघवी करणे, शौचास जाणाऱ्यांना दंड करण्याचे अधिकार दिले आहेत.