पुणे : शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या कारागृह भरती प्रकियेत मोठ्या संख्येने महिला उमेदवारांनी गर्दी केल्याने बुधवारी सकाळी गोंधळ उडाला. महिला उमेदवारांसोबत नातेवाइकांनी गर्दी केली होती. मुख्यालयाचा दरवाजा पहाटे साडेचारच्या सुमारास उघडल्यानंतर नातेवाईकही महिला उमेदवारांसोबत मैदानात शिरले. त्या वेळी चेंगराचेंगरी झाल्याने काही उमेदवारांना किरकोळ दुखापत झाली. बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी त्वरित गर्दी नियंत्रित केल्याने अनर्थ टळला.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या आवारात कारागृह विभागाची भरती प्रकिया सुरू आहे. भरती प्रक्रियेच्या बंदोबस्ताची जबाबदारी पुणे पोलिसांकडे आहे. मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बुधवारी भरती प्रक्रियेत महिला उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. चार हजार महिला उमेदवार प्रक्रियेत सहभागी होणार होत्या. प्रत्यक्षात १९०० महिला उमेदवार सहभागी झाल्या. बुधवारी पहाटेपासून महिला उमेदवार आणि नातेवाइकांनी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर गर्दी केली होती. पहाटे साडेचारच्या सुमारास मुख्यालयाचे प्रवेशद्वार उघडण्यात आले. तेव्हा महिला उमेदवार आणि त्यांच्याबरोबर असलेल्या नातेवाइकांनी एकदम आत शिरण्याचा प्रयत्न केला. रेट्यामुळे लाेखंडी दरवाजा निखळला. त्या वेळी महिला उमेदवारांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली. बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. किरकोळ जखमींवर प्रथमोपचार करण्यात आले.

घटनेत कोणी गंभीर जखमी नाही

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या आवारात गोंधळ उडाल्याची चित्रफीत प्रसारित झाली. रेट्यामुळे लोखंडी दरवाजा निखळला. या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

कारागृह विभागाच्या भरती प्रक्रियेची जबाबदारी पुणे पोलिसांकडे आहे. २९ जानेवारीपासून उमेदवारांना बोलावून विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. बुधवारी महिला उमेदवारांना भरती प्रकियेसाठी बोलावले होते. एकूण चार हजार महिला उमेदवारांना याबाबतची माहिती देण्यात आली होती. प्रत्यक्षात १९०० महिला उमेदवार सहभागी झाल्या होता. चेंगराचेंगरीच्या घटनेनंंतर भरती प्रक्रियेत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. – डाॅ. संदीप भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त, शिवाजीनगर पोलीस मुख्यालय

Story img Loader