पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड, लिजर, लाऊंज (एल थ्री) बारमधील झालेली बेकायदा पार्टी, तसेच अमली पदार्थ सेवन करण्यात आल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला. एल थ्री बारचा परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फर्ग्युसन रस्त्यावरील ‘एल थ्री ’ बारमध्ये रविवारी मध्यरात्री बेकायदा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीसाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी घेण्यात आली नव्हती, तसेच पार्टीत अल्पवयीन मुले सामील झाली होती. समाजमाध्यमात एल थ्री बारमधील पार्टी आणि प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची चित्रफीत प्रसारित झाली. त्यानंतर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. पोलिसांनी लिक्विड लीजर लाउंज (एल थ्री) बारचे जागामालक संतोष विठ्ठल कामठे (रा. ४४७/४, रजनीगंधा अपार्टमेंट, शिवाजीनगर), बारचालक उत्कर्ष कालिदास देशमाने (रा. फ्लॅट नं. ३०२, साईप्रसाद अपार्टमेंट लेन नं. १० मुंजाबा वस्ती, धानोरी), योगेंद्र गिरासे (रा. भूगाव), रवि माहेश्वरी (रा. एच १००६, ३८२ पार्क, मॅजेस्टिक, उंड्री), पार्टीचे आयोजक अक्षय दत्तात्रेय कामठे (रा. हडपसर), ध्वनिक्षेपक यंत्रणा सांभाळणारा (डीजे) दिनेश मानकर (रा. नाना पेठ), तसेच पार्टीचे आयोजन करणारे रोहन राजू गायकवाड (रा. भोसले पार्क, हडपसर) आणि मानस मलिक (वय ३३, रा. फ्लॅट नं. ४२, जयजवान नगर, राम मंदिराजवळ, येरवडा) यांना अटक केेली.

हेही वाचा…Porsche Accident: मद्यधुंद अवस्थेत पोर्श चालवून दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानेही रविवारी सायंकाळी एल थ्री बारमध्ये छापा टाकून सव्वातीन लाख रुपयांचा बेकायदा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने सहा कर्मचाऱ्यांना (वेटर) अटक केली. कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक अनंत पाटील आणि विठ्ठल बोबडे यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे कार्यालायचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी दिली.

हेही वाचा…“पोलिसांवरील कारवाई म्हणजे केवळ नौटंकी”; पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांचं टीकास्र; म्हणाले, “जोपर्यंत…”

मद्यालयाच्या मंजूर नकाशात बदल

फर्ग्युसन रस्त्यावरील इमारतीतील तळमजला आणि पहिल्या मजल्यावर संतोष कामठे यांच्या नावाने हॉटेल रेनबोला मद्य विक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. सध्या रेनबो हॉटेलचे नाव बदलण्यात आले असून, एल थ्री बार नावाने तेथे व्यवसाय करणात येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी छुपा मार्ग काढून मंजूर नकाशात बदल करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाहणी केली. तेव्हा परवाना कक्षात गंभीर स्वरुपाचे फेरबदल करण्यात आले आहे. परवाना कंक्षात अंतर्गत बदल करण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने परवान्याचे तत्काळ निलंबन करून बार लाखबंद (सील) करणयात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune state excise department revokes license of l3 bar after viral video reveals illegal party and drug use pune print news rbk 25 psg
Show comments