पुणे : पुणे स्टेशनजवळील रेल्वे मार्गावर असलेला साधू वासवानी उड्डाणपुलाचा उर्वरित भाग पाडण्याचे काम येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी रेल्वेने ब्लॉक देण्यास तत्त्वत: मान्यता दिली असून, तसे पत्र पुणे महापालिकेला पाठविले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोरेगाव पार्क परिसरात साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल आहे. हा पूल बांधून ५० वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला असल्याने महापालिकेने हा पूल पाडून तेथे नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलाच्या कामासाठी सुमारे ८३ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.

हेही वाचा – नवीन वर्षात महिलांना ‘गुलाबी रिक्षा’ मिळणार, राज्यभरातून कसा आहे प्रतिसाद?

हा पूल पाडण्याचे काम यापूर्वीच महापालिकेने सुरू केले आहे. हा पूल रेल्वे मार्गावर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे याचा आराखडा तयार करून महापालिकेने रेल्वे विभागाला पाठविला होता. सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली मध्यभागी खांब आहेत. नवीन पूल बांधताना असे खांब पुन्हा उभारू नयेत, असे रेल्वे विभागाचे म्हणणे होते. ‘बो स्ट्रिंग गर्डर’ या पद्धतीने हा नवीन पूल उभारण्यात यावा असे सांगण्यात आले होते. यामध्ये पुन्हा बदल करून ‘ओपन वेब गर्डर’ या पद्धतीने पूल उभारण्याचे निश्चित करण्यात आले. या पुलाची लांबी ५४ मीटर असून, त्याची बांधणी रेल्वे प्रशासनाच्या सुचनेनुसार केली आहे.

पुलाचा उर्वरित भाग पाडण्याचे काम सोमवारपासून सुरू केले जाणार आहे. या कामासाठी रेल्वेने ब्लॉकचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यासाठी ३० दिवसांचा ब्लॉक दिला आहे. या उड्डाणपुलाच्या जवळ असलेल्या झोपड्यांंतील नागरिकांचे हडपसर येथे स्थलांतर केले जाणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. आणि प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा – पुणे : ‘आयटी’तील कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर.. काय आहे मेट्रोचा प्रयत्न ?

रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेल्या सुमारे ६० झोपडपट्टीधारकांचे हडपसर येथे पुनर्वसन केले जाणार आहे. उर्वरित ४० ते ५० झोपडपट्टीधारकांना तेथून जाण्यासाठी आठवडाभराचा अवधी देण्यात येणार आहे. त्यांनी विरोध केल्यास सक्तीने पुनर्वसन करण्याबाबत विचार केला जाईल, असे पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune station area sadhu vaswani flyover pune municipal corporation decision pune print news ccm 82 ssb