पुणे : शेअर बाजारात तोटा झाल्याने शेअर दलालचे अपहरण करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी अमरावतीतील तिघांना अटक केली असून, शेअर दलालाची सुखरुप सुटका करण्यात आली.
याप्रकरणी डॉ. सुहास भांबुरकर, भूषण तायडे, अल्पेश गुडदे (तिघे रा. अमरावती) यांना अटक करण्यात आली. याबाबत एकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाचा मावसभाऊ शेअर दलाल आहे. शेअर दलालाच्या माध्यमातून आरोपींनी ५० लाख रुपये गुंतविले होते. शेअर बाजारातील व्यवहारात तोटा झाल्याने आरोपी दलालावर चिडले होता. शेअर बाजारातील तोट्यास दलाल कारणीभूत असल्याचा राग आरोपींच्या मनात होता. आरोपींनी त्यांच्याकडे जादा पैसे मागण्यास सुरुवात केली.
हेही वाचा…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक विवेक वाघ यांचे निधन
सोमवारी (१५ जुलै) आरोपींनी संगमवाडीतील खासगी वाहनतळ परिसरात मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भेटण्यास बोलाविले. त्यानंतर आरोपींनी दलालाला धमकावून मोटारीत बसविले आणि त्याचे चाकूच्या धाकाने अपहरण केले. दलालास आरोपींनी अमरावतीला नेले. तेथून त्यांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. आरोपींनी दलालाची सुटका करण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर शेअर दलालाच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी येरवडा पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी अमरावतीतून तिघांना अटक केली. शेअर दलालाची सुखरुप सुटका करण्यात आली. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमर कदम तपास करत आहेत.