पुणे : शहरातील नदीवरील पुलांप्रमाणेच आता नाले, ओढे, तसेच कालव्यांवर बांधण्यात आलेल्या पुलांचेही स्थापत्य लेखापरीक्षण (स्ट्रक्टरल ऑडिट) करण्यात येणार आहे. शहरातून वाहणाऱ्या नदीवर जागोजागी पूल बांधण्यात आलेले आहेत. या पुलांवरून वाहतूक होत असल्याने ते वापरण्यास योग्य आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी महापालिकेने या पुलांचे स्थापत्य लेखापरीक्षण करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यानुसार कामही सुरू करण्यात आले आहे. याच धर्तीवर आता शहरातील ओढे-नाले, तसेच कालव्यांवरील पुलांचेही स्थापत्य लेखापरीक्षण करण्याचे महापालिकेने ठरवले आहे.

शहरात आंबिल ओढा, भैरोबा नाला, मुठा डावा कालव्यावर पूल उभारण्यात आलेले आहेत. त्यांपैकी काही जुने झाले आहेत. तरीही त्यांचा वापर सुरू आहे. मात्र, आता स्थापत्य लेखापरीक्षणात हे पूल वापरण्यास योग्य आहेत की नाही, त्यांची सद्य:स्थिती नेमकी कशी आहे, याची तपासणी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख युवराज देशमुख यांनी दिली.

हेही वाचा : दुसरी महापालिका ही पुण्याची निकड ? कोणी मांडली भूमिका

३८ पैकी ११ पुलांची कामे पूर्ण

दोन वर्षांपूर्वी पुणे महापालिकेने नदीवरील ३८ पुलांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ केले होते. त्यात दर्शवण्यात आलेल्या त्रुटींची दुरुस्ती करण्यासाठी ३५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. प्रकल्प विभागाकडे या कामासाठी १५ कोटींचा निधी उपलब्ध होता. त्यामुळे ११ पुलांची कामे करण्यात आली. उर्वरित २७ पुलांच्या दुरुस्तीचे काम निधी उपलब्ध झाल्यानंतर करण्यात येणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader