पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. दैनंदिन गुणवत्ता फेरीमध्ये महाविद्यालयात निवड होऊनही विद्यार्थी प्रत्यक्ष प्रवेशासाठी जात नसल्याने जागा अडवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश समितीमार्फत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ९६ हजार १५० जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत झालेल्या तीन नियमित फेऱ्या, तीन विशेष फेऱ्यांतून ६७ हजार १४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर नामांकित महाविद्यालयांसह एकूण १४० महाविद्यालयांतील प्रवेश क्षमता पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नसल्याने २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान दैनंदिन गुणवत्ता फेरी राबवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार ३० सप्टेंबरपर्यंत ही फेरी राबवली जाईल. शिक्षण विभागाने संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार या दैनंदिन गुणवत्ता फेरीत पसंती नोंदवलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळूनही काही विद्यार्थी प्रवेशासाठी जात नाहीत. त्यामुळे त्या जागा भरण्याऐवजी अडवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्याही एका कनिष्ठ महाविद्यालयात निवडीची एकच संधी मिळेल. कोणत्याही महाविद्यालयात एकदा निवड झाल्यानंतर त्या दिवशी संबंधित विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्यास त्याला दुसऱ्या दिवशी त्या महाविद्यालयासाठी अर्ज करता येणार नाही.