या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे- लोणावळा मार्ग विस्ताराला पालिकांचा निधी कधी?

पुणे ते लोणावळा उपनगरीय व मुंबईपर्यंतच्या रेल्वे वाहतुकीच्या विस्तारासह पुणे, पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला गती देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पुणे-लोणावळा लोहमार्ग विस्तारीकरणाच्या प्रकल्पासाठी आपापल्या हिश्श्याचा निधी देण्यास पुणे आणि पिंपरी- चिंचवड दोन्ही पालिकांनी नकार दिल्याने या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. निवडणुकांमध्येही सर्वच राजकीय पक्षांना या प्रकल्पाचा विसर पडला आहे.

पुणे-लोणावळा दरम्यानच्या लोहमार्गाच्या तिहेरीकरणाची मागणी पंधरा वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपासून करण्यात येत आहे. रेल्वेच्या पुणे विभागानेही सातत्याने प्रवाशांच्या या मागणीचा पाठपुरावा करून रेल्वे बोर्डाकडे ही मागणी मांडली आहे. रेल्वे अर्थसंकल्पामध्येही वेळोवेळी हा विषय घेण्यात आला होता, पण त्याला हवी तशी गती मिळत नव्हती. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्यांच्या पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पात या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ९४० कोटी रुपयांच्या निधीला तत्त्वत: मान्यता दिली. त्यानंतर प्रकल्पासाठी आवश्यक असलेले सर्वेक्षण पूर्ण करून विभागाने रेल्वे बोर्डामध्ये या प्रकल्पाचा आराखडाही पाठवला आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातही या विषय घेण्यात आला आहे.

रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र शासनाने संयुक्तपणे पुणे-लोणावळा दरम्यान लोहमहामार्गाचे तीनपदरीकरणच नव्हे, तर चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकल्पाच्या खर्चात राज्य शासन व रेल्वेचा समान हिस्सा असणार आहे. राज्यातील रेल्वे प्रकल्प उभारणीसाठी स्थापलेल्या कंपनीच्या सूचनेनुसार पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या बैठकीत काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाच्या निधीबाबत चर्चा झाली होती. पुणे ते लोणावळा हा ७० किलोमीटरचा नवा रेल्वेमार्ग विकसित करण्यासाठी  राज्य शासनाकडून ५० टक्के आणि पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व पीएमआरडीए यांच्यामार्फत ५० टक्के रक्कम उभी करण्याबाबत निर्णय झाला होता. त्यानुसार दोन्ही पालिकांच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत हा निर्णय ठेवण्यात आला असता या प्रकल्पाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत तो फेटाळण्यात आला.रेल्वे मंत्रालयाकडून सर्वेक्षण व मंजुरीच्या फेऱ्यामध्ये अनेक वर्षे हा प्रकल्प रखडला होता. आता मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे लगेचच काम सुरू होईल, अशी शक्यता असताना या कामात खोडा पडला.

प्रकल्पासाठी कुणाचा हिस्सा किती

पुणे- लोणावळा लोहमार्ग विस्तारीकरणासाठी जमिनीचा खर्च वगळता २३०६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यातील पन्नास टक्के रक्कम रेल्वे व राज्य शासन उभे करणार आहे. उर्वरित रकमेपैकी ३८०.४९ कोटीची रक्कम देण्यास पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मंजुरी दिली आहे. पुणे पालिकेला ३९२ कोटी, तर पिंपरी- चिंचवड पालिकेला २५१ कोटी रुपये द्यायचे आहेत.