पुणे : राज्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बिगरमोसमी पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे उसाची उत्पादकता व साखर उताऱ्यामध्ये दहा ते बारा टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. हंगामपूर्व अंदाज ८८ लाख टनांचा होता, आता ९५ लाख टनांवर साखर उत्पादन जाण्याचा अंदाज आहे, अशी माहिती वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केले आहे.
ठोंबरे म्हणाले, की हंगामाच्या सुरुवातीस राज्याचा गळीत हंगाम अंदाजे ९० ते १०० दिवसांचा अपेक्षित होता. मात्र प्रत्यक्षात डिसेंबरअखेर एकूण ९४६ लाख टन ऊस उपलब्धतेत पाच टक्के वाढ होऊन उसाची उपलब्धता ९९३ लाख टनांवर गेली आहे. डिसेंबरअखेर ४२८ लाख टन उसाचे गाळप झाले असून, ६० दिवसांत ३८.२० लाख टन साखरनिर्मिती झाली आहे. अद्याप ५६५ लाख टन गाळप बाकी आहे.
हेही वाचा : रेल्वेचे असेही ‘कोट्यधीश’ तपासनीस! फुकट्या प्रवाशांना भरवताहेत धडकी
बिगरमोसमी पावसामुळे प्रतिहेक्टरी उसाच्या उत्पादनात आठ ते दहा टक्के वाढ झाल्याने एकूण उपलब्ध उसामध्ये पाच टक्के वाढ झाल्याने एकूण गाळपाचे दिवस १०० वरून १२५ ते १३० दिवस अपेक्षित आहेत. त्यामुळे डिसेंबरअखेर फक्त ४० टक्के ऊस गाळपातून ३८ लाख टन साखर उत्पादन झाले असल्याने उर्वरित ६० टक्के ऊस गाळपातून एकूण ९५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे.
साखर उत्पादनात वाढीची कारणे
बिगरमोसमी पावसामुळे प्रति हेक्टर ऊस उत्पादनात झालेली वाढ हे साखर उत्पादनात वाढ होण्याचे प्रमुख कारण आहे. त्यासह केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३च्या आदेशान्वये उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादनास घातलेली बंदी व त्यामुळे इथेनॉलकडे वळवण्यात आलेल्या साखरेच्या वापरात मोठी घट हे दुसरे कारण आहे. हंगामाच्या सुरुवातीस महाराष्ट्रात ८८ लाख टन निव्वळ साखर उत्पादनाचा अंदाज विस्मा, साखर आयुक्तालय व साखर संघाने व्यक्त केला होता. अंदाजे आठ ते दहा लाख टन साखर इथेनॉलकडे वळवली जाणे अपेक्षित होते. मात्र वरील परिस्थितीमुळे आता चालू हंगामात निव्वळ साखरेचे उत्पादन ९५ लाख टन होण्याचा अंदाज विस्मा व साखर संघ यांच्या संयुक्त अभ्यासातून वर्तविण्यात येत असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.
हेही वाचा : इंद्रायणी, पवना घेणार मोकळा श्वास… घेतला ‘हा’ मोठा निर्णय
इथेनॉल निर्मितीला परवानगी द्यावी
देशांतर्गत वापरासाठी एकूण २८० लाख टन साखर लागते. प्रत्यक्ष या वर्षीचे अपेक्षित साखर उत्पादन ३२० लाख टन इतके आहे. देशांतर्गत वापरासाठी मुबलक साखर उपलब्ध असेल. साखरेचा तुटवडा निर्माण होऊन भाववाढ होण्याची भीती निराधार आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मितीला केंद्राने परवानगी देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केली आहे.