पुणे : सलग तीन दिवस पुणेकरांनी चाळिशीपार तापमान सहन केल्यानंतर गुरुवारी कमाल तापमानात किंचित घट झाली. आता पुढील तीन दिवस तापमान स्थिर आणि सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.एप्रिल महिना सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. विशेषत: गेल्या तीन दिवसांमध्ये शहर आणि परिसरातील तापमान झपाट्याने वाढल्याचे दिसून आले. कमाल तापमान वाढण्यासह किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक नोंदवले गेले. रात्रीही उकाडा जाणवत होता. विशेषत: ७ ते ९ एप्रिल हे सलग तीन दिवस पारा चाळीशीपार राहिला.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, सोमवारी (७ एप्रिल) लोहगाव येथे ४२.२, शिवाजीनगर येथे ४०.३, पाषाण येथे ४०.७, चिंचवड येथे ३९.८ अंश सेल्सिअस, मंगळवारी लोहगाव येथे ४२.७, तर शिवाजीनगर येथे ४१.३, पाषाण येथे ४०.६, चिंचवड येथे ४०.३ अंश सेल्सिअस, बुधवारी लोहगाव येथे ४२.२, शिवाजीनगर येथे ४०.७, पाषाण आणि चिंचवड येथे येथे ४०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर गुरुवारी (१० एप्रिल) लोहगाव येथे ४१.८, शिवाजीनगर येथे ३९.७, पाषाण येथे ३९, चिंचवड येथे ३७.९, मगरपट्टा येथे ३८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्यामुळे ७ ते ९ एप्रिलच्या तुलनेत गुरुवारी तापमानात काही प्रमाणात घट झाली. या पार्श्वभूमीवर, पुढील तीन दिवस शहर आणि परिसरातील कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहण्याचा, दुपारनंतर आकाश ढगाळ होण्याचा अंदाज आहे. तापमानात घट होत असल्यामुळे उकाड्यापासूनही थोडासा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होत आहे. मात्र, तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे.