उन्हाळा सरत आला, की पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी पळापळ सुरू होते. महापालिका आपल्या पातळीवर पाणीकपात सुरू करते. ती एक वेळ मिळणारे पाणी ते एक दिवसाआड पाणी अशी असते. टंचाईच्या काळात पाण्याचा दाबही कमी होतो; मग थेट पंप लावून पाणी खेचले जाते आणि त्यामुळे समान पाणीपुरवठा हा विषय बाजूलाच पडतो. पुण्यासारख्या शहरात अनेक ठिकाणी टँकरने पाणी मागविण्याची वेळ येते. मात्र, काही ठिकाणी इतके पाणी असते, की पाणीटंचाई म्हणजे काय रे भाऊ, असा प्रश्न पडावा. अशा काही ठिकाणी अनेक पुणेकर आपल्या दुचाकी-चारचाकींनाही नळीने यथेच्छ आंघोळ घालताना दिसतात. घरातल्या कुंड्या असोत किंवा बागेतली झाडे, त्यांना पाणी देतानाचे चित्र काही वेगळे नसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे सगळे सुरू असताना पाण्याची बचत करणे किती महत्त्वाचे आहे, हे सांगणारेही पुणेकर आहेत आणि ते आपापल्या परीने त्याचे महत्त्व इतर पुणेकरांना सांगत असतात. जैन युवक महासंघही अशीच एक संस्था. त्यांनी ‘पाणी वाचवा’ असा संदेश देणारी सायकल फेरी काढली आणि हा पाणीबचतीचा संदेश पोचवला. ‘मी आहे वॉटर सेव्हिंग चॅम्पियन!’ असे घोषवाक्य घेऊन सायकल फेरीचे आयोजन केले गेले. सारसबाग ते खडकवासला चौपाटी अशा या सायकल फेरीत अडीचशेहून अधिक पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते. खडकवासला येथे सर्वांनी पाणी बचतीसाठी जनजागृती करण्याचीदेखील शपथ घेतली. या फेरीची संकल्पना आणि नियोजन सायकलपटू राहुल शहा यांचे होते. सायकल मस्ती या ग्रुपने फेरीदरम्यान सायकलस्वारांना स्वेच्छेने पाठिंबा दिला. श्री श्वेतांबर जैन मूर्तिपूजक संघ, सिंहगड रोड यांच्यातर्फे सायकलस्वारांसाठी पाण्याची व्यवस्था केली होती.

हेही वाचा >>>जिल्हा प्रशासनात ‘लेटर बॉम्ब’ : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेंचे राजकीय नेत्यांची घनिष्ठ संबंध; खेडच्या प्रांताधिकाऱ्यांचे निवडणूक आयोगाला पत्र

या सायकलस्वारांनी घेतलेली शपथ आपणही नक्कीच घेऊ शकतो. अगदी साध्या गोष्टींची सवय लावून घेतली, तरी हे शक्य आहे – अंघोळीसाठी शाॅवरचा वापर न करता बादली वापरीन, वाहन धुताना बादलीत पाणी घेईन, ब्रश करताना अथवा दाढी करताना नळ बंद ठेवीन, झाडांना पाइप न वापरता बादलीतून पाणी देईन, झाडांना दुपारी पाणी देण्यापेक्षा सकाळी लवकर पाणी देईन, माझ्या घरातील पाण्याची गळती सर्वोच्च प्राधान्याने दूर करीन, भांडी धुताना नळ बंद ठेवायला सांगीन, घरी आलेल्या प्रत्येकाला गरजेनुसारच पाणी देईन, नळ सतत सुरू ठेवून भाज्या/फळे धुणार नाही, शक्य असेल तिथे पाणी साठवण्याचा प्रयत्न करीन, शहरात कोठेही पाण्याची गळती दिसल्यास ती बंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन, बागेतील झाडांना पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर सिस्टीम वापरण्याचा प्रयत्न करीन, वॉशिंग मशिन फक्त तेव्हाच वापरीन जेव्हा त्यावर इष्टतम भार असेल, भविष्यासाठी पाणी बचतीचे महत्त्व मुलांना शिकवीन…

हेही वाचा >>>पुणे : लष्करात भरतीच्या बदल्यात पैशांची मागणी; लेफ्टनंट कर्नलवर सीबीआयकडून गुन्हा

पाणी हे जीवन आहे आणि उद्याच्या पिढीसाठी ते जपणे हे आपले कर्तव्य आहे, या भावनेतून कोणत्याही गावात वा शहरात आपण राहत असलो, तरी तेथे उपलब्ध पाणी योग्य प्रकारे वापरल्यास त्याची बचत होऊ शकेल. जर हे झाले नाही, तर भविष्यात पाण्यासारखा पैसा खर्च करूनही पाणी मिळणे अवघड होईल. धरणातील पाण्याचे बाष्पीभवन, भूजल पातळी खालावणे अशा विविध समस्यांमुळे उपलब्ध पाणीसाठ्याची कमतरता जाणवू शकते. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे झाडाखाली अंघोळ करणे (जेणेकरून झाडांना वेगळे पाणी नको) अथवा एकाच ताटात दोघांनी जेवण्यासारखे (म्हणजे एकच ताट धुवावे लागेल) पर्याय मराठवाड्यातील मंडळींना शोधावे लागले. जलसंपन्न पुण्यातील नागरिकांना अशा उपाययोजना करण्यापर्यंतची वेळ येऊ नये, असे वाटत असेल, तर पाणीबचतीचा धडा आपणही नीट समजून घ्यायला हवा. नाहीतर ‘पुणे तेथे काय उणे’ ही म्हण कालबाह्य होण्यास आपणच जबाबदार असू हे निश्चित!

shriram.oak@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune summer water shortage measures municipal corporation pune print news apk 13 amy
Show comments