पिंपरी-चिंचवड: भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनीषा सुशांत भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडून खुलासा देण्यात आला आहे. यात सूर्या रुग्णालयाचा उल्लेख केला असून बेजबाबदारपणाचा अप्रत्यक्षरीत्या आरोप करण्यात आला आहे. यावर सूर्या रुग्णालयाने प्रत्युत्तर देत खूलासा केला आहे.
रुग्णालयाचे डॉ. दिनकर पासलकर म्हणाले, आम्ही प्रामाणिकपणे सांगत आहोत, जेव्हा तनीषा रुग्णालयात आल्या तेव्हा त्यांना आम्ही सर्व वैद्यकीय सुविधा योग्य वेळी दिल्या आहेत. प्रसूती झाल्यानंतर त्यांची बाळं देखील आमच्याकडे उपचार घेत आहेत. ते व्यवस्थित आहेत. आमच्याकडे रुग्ण आल्यानंतर आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेली आहे.
तनीषा यांना आधी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. तिथं उशीर झाल्याने ससून आणि मग सूर्या हॉस्पिटलला आणले. रुग्णाला त्रास होत होता. तेव्हा डॉक्टरांना कार्डियक ओपिनियनची गरज होती. त्या सुविधा आमच्या रुग्णालयात नसल्याने आमच्या डॉक्टरांनी दुसऱ्या रुग्णालयात नेलं. त्यामध्ये दिरंगाई झालेली नाही. आम्ही आधी उपचाराची पूर्तता केलेली आहे. रुग्णाला कर्करोग होता?, याबाबत आम्हाला काही माहिती नाही, तसा पूर्व वैद्यकीय इतिहास माहीत नाही. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केलेल्या आरोपावर आम्ही काही बोलणार नाहीत. असं मत सूर्या रुग्णालयाचे डॉ. दिनकर पासलकर यांनी व्यक्त केलं आहे.