पुणे : स्वारगेट ते कात्रज या मेट्रोच्या विस्तारित मार्गात बालाजीनगर-धनकवडीपाठोपाठ आता आणखी एका स्थानकाचा समावेश करण्याचा निर्णय महामेट्रोकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे यासाठीच्या निविदा नव्याने काढण्यात येणार आहेत. तसेच, सुधारित आराखडा मंजुरीसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला विलंब होणार आहे. बिबवेवाडी येथे नवीन मेट्रो स्टेशन उभारले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर हाच मार्ग पुढे कात्रजपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वारगेट ते कात्रज हा सुमारे साडेपाच किलोमीटरचा मेट्रोचा विस्तारित मार्ग असणार आहे. या मूळ आरखड्यात मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज अशा तीन स्थानकांचा समावेश होता.

मात्र, तीन स्थानकांमध्ये अंतर अधिक असल्याने तसेच धनकवडी परिसरातील नागरिकांना याचा फायदा व्हावा, यासाठी एक स्थानक वाढविण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार संपूर्ण अभ्यास करून महामेट्रोने दोन महिन्यांपूर्वी बालाजीनगर या नवीन स्थानकाला मान्यता दिली होती.

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी या मेट्रो मार्गाचा आढावा घेतला. त्या वेळी या मार्गावर बिबवेवाडी येथेही स्थानक करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार महामेट्रोने पुन्हा एक स्थानक वाढविण्याचा आराखडा तयार केला आहे. त्याचा सुधारित प्रस्ताव महापालिकेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता.

याला महापालिकेच्या मुख्य सभेत नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. या दोन नवीन स्टेशनमुळे मेट्रो प्रकल्पाचा खर्च ६८३ कोटींनी वाढणार आहे. तसेच, या वाढीव खर्चास पुन्हा राज्य आणि केंद्र सरकारची मान्यता घ्यावी लागणार आहे. यामध्ये वेळ जाणार असल्याने या मेट्रोला उशीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खर्च ६८३ कोटींनी वाढला

स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मेट्रो मार्गाच्या जुन्या आराखड्यानुसार या प्रकल्पासाठी २ हजार ९५४ कोटींचा खर्च येणार होता. मात्र, नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या दोन स्थानकांमुळे हा खर्च ६८३ कोटींनी वाढून ३ हजार ६३७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या विस्तारित मार्गासाठी महापालिकेला या प्रकल्पासाठी १८१ कोटी रुपयांचा खर्च द्यावा लागणारा होता. त्यामध्येही ६८ कोटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेला आता २५० कोटी होणार आहे.

Story img Loader