पुणे : राज्यावरील अवकाळीचे ढग विरून आकाश निरभ्र झाले आहे. त्यामुळे उन्हाचा कडाका वाढून पुणे शहर आणि परिसराचे कमाल तापमान ४०.० अंशाच्या पुढे गेले आहे. लवळे येथे सर्वांधिक ४१.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले असून, शिवाजीनगरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी ३९.९ अंशाची नोंद झाली आहे.
गेल्या आठवड्यात राज्यावर अवकाळीचे ढग होते. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपीटही झाली. त्यानंतर अवकाळीचे ढग विरून कमाल तापमानात वेगाने वाढ झाली आहे. रविवारी लवळे येथे ४१.८, हडपसरमध्ये ४१.७, कोरेगाव पार्क, शिरूर, चिंचवडमध्ये ४१.५, वडगाव शेरीत ४१.३, राजगुरुनगरमध्ये ४१.२, पुरंदरमध्ये ४१.०, बालेवाडीत ४०.५, एनडीएत ४०.४, मगरपट्ट्यात ४०.१, खेडमध्ये ४०.१, पाषाणमध्ये ४०.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
शिवाजीनगरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी ३९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. इंदापूर, तळेगावात ३९.१, दौंडमध्ये ३८.८, हवेलीत ३७.२ आणि लवासात ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील तीन – चार दिवस आकाश निरभ्र राहण्याचा आणि तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.