पुणे : तलाठी भरती परीक्षेच्या विरोधात न्यायालयात केलेल्या याचिका, उशिरा आल्याने उमेदवारांना परीक्षा केंद्रात नाकारलेला प्रवेश, परीक्षेत करण्यात आलेली हायटेक कॉपी आणि त्यानंतर पकडलेले आरोपी, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याची झालेली मागणी, आंदोलनांमुळे अनेक उमेदवारांना परीक्षा केंद्रावर जाण्यात आलेल्या अडचणी अशा विविध कारणांनी बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेत पहिल्यापासूनच विविध अडचणी, अडथळे येत आहेत. हे सर्व अडथळे पार केल्यानंतर आता परीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न आणि काही प्रश्नांची उत्तरे यात घोळ झाल्याचे समोर आले आहे. ही बाब परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीने देखील मान्य केली आहे. या पार्श्वभूमीवर भूमि अभिलेख खात्याने ‘त्या’ प्रश्नांबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : बालेकिल्ल्यात शरद पवार आणि अजितदादा पुन्हा एकाच व्यासपीठावर? ‘हे’ निमित्त…!

तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर असे तीन टप्पे करण्यात आले होते. एकूण परीक्षेची ५७ सत्रे झाली. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसुचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदविण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत मुदत देण्यात आली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदविण्यात आले. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले आहेत.

हेही वाचा : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पुणे दौऱ्याचा असाही फायदा

दरम्यान, परीक्षेत एकूण ५७०० प्रश्न होते. आक्षेप नोंदविण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपांपैकी नऊ हजार आक्षेप टीसीएस कंपनीने ग्राह्य धरले. एकूण १४६ प्रश्नांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. ११४ प्रश्नच चुकीचे होते, म्हणजेच प्रश्न किंवा उत्तरसुची चुकलेले असे हे प्रश्न होते, त्याचे १०० टक्के गुण उमेदवारांना देण्यात येणार आहेत. उर्वरित ३२ प्रश्नांच्या उत्तरसूचीमध्ये देण्यात आलेले उत्तर चुकीचे होते, त्यामुळे योग्य उत्तर देणाऱ्यांना गुण देण्याचा मोठा निर्णय भूमि अभिलेख खात्याने घेतला असल्याचे अपर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune talathi recruitment exam 114 wrong questions decision of land records department for candidates pune print news psg 17 css
Show comments