Pune Porsche Crash Latest Updates: पुण्यातल्या अल्पवयीन गर्भश्रीमंत मुलाने पोर्श कारने अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना धडक दिली. त्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. हा अल्पवयीन मुलगा पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. या प्रकरणात या मुलाला जामीनही मिळाला ज्याचे पडसादही राजकीय वर्तुळात आणि समाजात उमटले. ज्यानंतर या मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. यानंतर आता मुलाच्या आई वडिलांनी त्यांच्या कार चालकाला पैशांचं आमिष दिलं होतं, आरोप चालकाने त्याच्या डोक्यावर घ्यावा यासाठी हे आमिष दिलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.
अल्पवयीन मुलला बालसुधारगृहात धाडण्यात आलंय
पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. बाल न्याय मंडळाने याबाबतचे आदेश बुधवारी रात्री दिले.बाल न्याय मंडळाचे प्रमुख दंडाधिकारी एम. पी. परदेशी, सदस्य डॉ. एल. एन. धनवडे, के. टी. थोरात यांच्या मंडळासमोर सुनावणी झाली. बुधवारी दिवसभर या प्रकरणावर सुनावणी झाली होती. सुनावणी झाल्यानंतर मंडळाने निकाल राखून ठेवला होता. रात्री आठच्या सुमारास बाल न्याय मंडळाने निकाल दिला. त्यानंतर मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. यानंतर आता पोलीस सूत्रांनी नवी माहिती दिली आहे.
१७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श चालवली आणि दोघांना धडक दिली
१७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात पोर्श ही कार चालवत आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण-तरुणीचा बळी घेतला. या सगळ्या प्रकरणानंतर या मुलाच्या आई वडिलांनी त्यांच्या चालकाला बक्कळ पैसे देण्याचं आमिष दिलं होतं. मुलगा कार चालवत नव्हता, तर मागच्या सीटवर बसला होता असं पोलिसांना सांग त्या बदल्यात आम्ही तुला पैसे देऊ असं या मुलाच्या आई वडिलांनी त्यांच्या चालकाला सांगितलं होतं. पोलीस सूत्रांनी इंडिया टुडेला ही माहिती दिली आहे. कल्याणी नगर भागात १९ मेच्या पहाटे हा अपघात झाला. या अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. यानंतर या अल्पवयीन मुलाच्या घरी कार चालक म्हणून काम करणाऱ्या चालकाने असा जबाब दिला की कार अल्पवयीन मुलगा नाही तर तो चालवत होता. मात्र या सगळ्या दरम्यान या मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली.
अल्पवयीन मुलाने पोर्श चालवत असल्याचं मान्य केलं
२१ मे रोजी ही घटना घडली. तसंच इतर पाच जणांनाही याच प्रकरणात अटक झाली. यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे स्पष्ट केलं १७ वर्षांच्या त्या अल्पवयीन मुलाने आपण पोर्श कार चालवत असल्याचं मान्य केलं आहे. तसंच त्याला या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की आपण अशा पद्धतीने कार चालवली तर अरुंद रस्त्यावर काय होऊ शकतं. हे अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे. अमितेश कुमार यांनी हेदेखील सांगितलं की हा मुलगा कारच्या मागच्या सीटवर बसला होता आणि या कुटुंबाचा चालक कार चालवत होता हे सांगून मुलाला वाचवण्याचाही प्रयत्न झाला. मात्र याबाबत आता चालकाला पैशांचं आमिष दिलं होतं ही नवी माहिती समोर आली आहे.