पुणे: समाज माध्यमातून झालेल्या ओळखीतून एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एकाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तनुज माकीन (रा. जबलपूर, मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तनुज यांची समाज माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर तरुणी आणि आरोपी तनुजची मैत्री झाली. तनुजने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिला हडपसर भागातील सदनिकेत बोलावून घेतले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. काही दिवसानंतर तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. ‘माझ्याबरोबर विवाह करायचा असेल तर तुझी छायाचित्रे पाठवून दे’, असे त्याने तिला सांगितले. तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने तिच्याशी बोलणे बंद केले.

तरुणीने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा ‘माझा नाद सोड नाही तर तुझ्यासह कुटुंबीयांना जिवे मारू’, अशी धमकी त्याने दिली. त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारे अटकेत

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. संदीप रवींद्र पाटील (वय २०), साहिल संतोष साळवे (वय १९, दोघे रा. मानाजीनगर, नऱ्हे) यांना अटक करण्यात आली. याबाबत पीडित मुलीच्या आईने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी पाटील आणि साळवे यांनी एका १४ वर्षीय मुलीशी मैत्री केली. त्यानंतर दोघांनी मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिल्यास आई आणि भावाला जिवे मारू, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील तपास करत आहेत.

जाब विचारणाऱ्या महिलेचा विनयभंग

मुलीचा पाठलाग करणाऱ्या तरुणाच्या वडिलांकडे तक्रार केल्याने एका महिलेला धमकावून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, सोहम शशी चव्हाण (वय २२) आणि त्याचे वडील शशी पांडू चव्हाण (वय ६५, दोघे रा. येरवडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिलेच्या १६ वर्षीय मुलीचा आरोपी सोहम चव्हाण पाठलाग करुन तिला त्रास देत होता. मुलीने याबाबतची माहिती आईला दिली. त्यानंतर मुलीची आई चव्हाण यांच्या घरी गेली. तिने मुलाबाबत तक्रार केली. तेव्हा आरोपींनी तिला शिवीगाळ करुन धमकावले. ‘पोलिसांकडे तक्रार दिल्यास मुलगी अठरा वर्षांची झाल्यानंतर तिला पळवून नेतो’, अशी धमकी त्यांनी महिलेला दिली. सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका देवकर तपास करत आहेत.