पुणे : राज्यातील दुर्गम भागात सुरू करण्यात आलेली टेलिमेडिसीन सेवा रुग्णांसाठी आधार ठरत आहे. दुर्गम भागात टेलिफोन, इंटरनेट किंवा इतर संपर्काद्वारे वैद्यकीय माहितीची आदान-प्रदान करून वैद्यकीय सल्ल्यासाठी आणि आजारी रुग्णांचे निदान करण्यासाठी या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात ५ वर्षांत या सेवेचा १ लाख १३ हजार रुग्णांना फायदा झाला आहे.
आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना टेलिमेडिसीन पद्धतीने आरोग्य सेवा दिली जाते. यात दूरदृश्य प्रणालीद्वारे रुग्णाशी संवाद साधला जातो आणि चॅटच्या माध्यमातून तज्ज्ञ सल्ला देतात. याशिवाय विशेष तंत्रज्ञानामुळे ई-स्टेथोस्कोपद्वारे रुग्णाच्या हृदयाचे ठोके आणि फुफ्फुसाचे कार्य ऐकण्याची सोयही यात असते. रुग्णाचे एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, एमआरआय विशिष्ट सॉफ्टवेअरने पाठवताही येतात. याशिवाय रुग्णाचे ईसीजी, ईको, अँजिओग्राफी थेट पाहण्याची सुविधाही उपलब्ध आहे. यामुळे दुर्गम आणि आदिवासी भागातील रुग्णांचा या सेवेला वाढता प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा…अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील रुग्ण मृत्यूनंतर दुसऱ्याला जीवदान देऊन गेला!
आरोग्य विभागाने ७ सप्टेंबर २००६ रोजी इस्त्रो संस्थेच्या मदतीने आरोग्य विभागाने टेलिमेडिसीन सेवा सुरू केली. हा पथदर्शी प्रकल्प मुंबईतील के.ई.एम. हॉस्पिटलद्वारे राज्यातील लातूर, बीड, नंदूरबार, सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालय कराड येथे राबविण्यात आला. नंतर या सेवेचा विस्तार २००७-०८ मध्ये २० जिल्हा रुग्णालये, २ उपजिल्हा रुग्णालये आणि ४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत करण्यात आला. त्यानंतर या सेवेचे जाळे २०११-१२ मध्ये ३० उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांत वाढविण्यात आले. आरोग्य विभागाने २०१४-२०१५ मध्ये आदिवासी जिल्ह्यांमधील ग्रामीण रुग्णालयांत या सेवेचा विस्तार केला.
टेलिमेडिसीन सेवेचा फायदा
वर्ष – रुग्णांना सल्ला
२०१९-२० : ३१ हजार २८६
२०२०-२१ : १२ हजार ७८६
२०२१-२२ : १५ हजार ६६५
२०२२-२३ : २५ हजार ८०५
२०२३-२४ : २७ हजार ४००
२०२४-२५ (सप्टेंबर २०२४ पर्यंत) : १३ हजार ६१२