पुणे : यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीला मार्चमध्येच उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. बुधवारी लोहगाव आणि कोरेगाव पार्क येथे ४०.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान आहे. शुक्रवारपासून तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या तीन महिन्यांत शहरातील तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवले गेले आहे. थंडीचा मोसमही ढगाळ, उकाडा, गारवा असा संमिश्र हवामानाचा राहिला होता. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात शिवाजीनगर येथे मार्चमधील कमाल तापमान सरासरी ३३.४ अंश सेल्सियस ते ३६.७ अंश सेल्सियस दरम्यान राहिले आहे. मात्र, यंदा मार्चच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये सर्वाधिक ३९.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते. त्यापूर्वी २०२२ मध्ये मार्चमध्ये ३९.७ अंश सेल्सियस, तर २०१९ मध्ये मार्चमध्ये सर्वाधिक ४०.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. बुधवारी लोहगाव येथे ४०.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. गेले दोन दिवस लोहगाव, कोरेगाव पार्क आणि चिंचवड येथे ४० अंश सेल्सियस, तर शिवाजीनगर, पाषाण, मगरपट्टा येथे ३९ अंश सेल्सियस तापमान होते.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, सध्या आकाश निरभ्र आहे. हवेतील आर्द्रता कमी आहे. तसेच सूर्यकिरणांची तीव्रता जास्त, तसेच प्रति चक्रवाती स्थिती कायम आहे. उत्तरेतील राज्यांमध्येही तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे सध्या शहरातील तापमान वाढले आहे. गुजरातमध्ये उष्णतेची लाट आहे, गेले दोन दिवस मुंबईतही उष्णतेची लाट होती. शहरातील तापमान सरासरीपेक्षा तीन अंश सेल्सियस अधिक आहे. मात्र, शुक्रवारपासून तापमानात काही प्रमाणात घट होण्याचे संकेत आहेत.

Story img Loader