पिंपरी-चिंचवडमध्ये डॉक्टर तरुणीचा पतंगाच्या मांजाने गळा कापला गेल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नाशिकफाटा येथील पुलावर घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, कृपाली निकम (वय २५, गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर) असे मृत्यू झालेल्या डॉक्टर तरुणीचे नाव आहे. कृपाली पुण्याहून भोसरीच्या दिशेने दुचाकीवरून जात होती. तेव्हा धावत्या दुचाकीवरील कृपालीच्या गळ्याला पतंगाच्या मांजाने कापले आणि ती रस्त्यावर कोसळली. या घटनेत ती गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळावरील लोकांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने तिचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेमुळे पुन्हा एकदा पतंगाचा मांजाचे परिणाम समोर आले आहेत. काही महिन्यांपूर्वी काळेवाडी येथे देखील दुचाकीवरून जाताना चिमुकल्याचा गळा पतंगाच्या मांजाने कापला गेला होता. यात तो गंभीर जखमी झाला होता. घटनेनंतर पतंगाच्या मांजावर कारवाई व्हावी अशी मागणी पीडित मुलाच्या वडिलांनी केली होती. तर, दुसऱ्या एका घटनेत काही महिन्यांपूर्वी हमजा खान हा तीन वर्षीय चिमुकला मांजामुळे गंभीर जखमी झाला होता. त्यांच्या डोळ्यांना इजा झाली होती, त्याच्या डोळ्यांना ३२ टाके पडले होते.

तसेच आणखी एका घटनेत रंगनाथ भुजबळ नामक एक ज्येष्ठ नागरिक सिग्नलवर दुचाकी घेऊन थांबले असताना पंतगाचा मांजा त्यांच्या चष्म्याच्या अडकला. वेळीच त्यांचा लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी हाताने मांजा हटवला, पण यामुळे त्यांचा गळा आणि बोटं कापली गेली होती.