पुणे : वार्षिक बाजारमूल्य दरात (रेडीरेकनर) विधी महाविद्यालय रस्ता परिसराने यंदा कोरेगाव पार्क परिसरालाही मागे टाकले आहे. रेडीरेकनरच्या दरानुसार विधी महाविद्यालय रस्ता परिसरात हजार चौरस फुटांच्या घराची किंमत किमान सुमारे पावणेदोन कोटी रुपयांच्या घरात जाईल. त्यावरील इतर शुल्कांचा विचार करता, ही किंमत दोन कोटींचा टप्पा पार करील.

या आर्थिक वर्षासाठी (२०२५-२६) राज्य शासनाकडून वार्षिक बाजारमूल्य दरात (रेडीरेकनर) वाढ करण्यात आल्यानंतर शहरातील विधी महाविद्यालय रस्ता परिसर सर्वाधिक महागडा ठरला आहे. गेल्या तीन वर्षांपर्यंत पहिल्या क्रमांकावर असलेल्या कोरेगाव पार्क परिसराला त्याने मागे टाकले असून, येथील प्रतिचाैरस फुटांचा दर १६ हजार ८१६ रुपये एवढा झाला आहे. कोरेगाव पार्क परिसराचा प्रतिचाैरस फुटांचा दर १६ हजार ६८१ एवढा आहे.

पुणे आणि उपनगरांतील रेडीरेकनरचा दर सोमवारी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून जाहीर करण्यात आला. त्यानुसार पुण्यात रेडीरेकनरच्या दरात सरासरी ४.१६ टक्के, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ६.६९ टक्के वाढ करण्यात आली आहे. दरवाढ झाल्याचा थेट परिणाम सदनिका, मोकळी जागा, दुकान खरेदीवर होणार असल्याने शहरातील प्रमुख भागातील रेडीरेकनरचा प्रतिचौरस फुटांचा दर किती असेल, याबाबत उत्सुकता होती.प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील सदनिकांसाठी १५ हजार ३५५ रुपये प्रतिचौरस फुटांप्रमाणे पैसे मोजावे लागणार आहेत. गरवारे हायस्कूल ते एसएनडीटी, कर्वे रस्त्यांवरील मालमत्ता प्रतिचौरस फूट १४ हजार रुपयांपेक्षा जास्त दराने खरेदी कराव्या लागणार आहेत. ज्ञानेश्वर पादुका चौक ते गणेशखिंड रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावरील सदनिकांचे दर १२ हजार रुपये प्रतिचौरस फूट असून, गोखले चौक ते बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्त्यावरील सदनिकांचे प्रतिचौरस फूट दर १० हजारांपेक्षा जास्त आहेत.चौकट

सर्वांत कमी दरनांदोशी : ३ हजार २१५ रुपये प्रतिचौरस फूट

किरकिटवाडी : २ हजार ९३१ रुपये प्रतिचौरस फूट

सन २०२० पासून प्रत्येक मान्यता, मंजुरी आणि शुल्क रेडीरेकनरच्या दराशी संलग्न असल्यामुळे बांधकामाचा खर्च वाढणार आहे. रेडीरेकनरचे दर वाढल्याने मुद्रांक शुल्क, महापालिकेच्या अन्य करातही वाढ होणार आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांपुढेही अडचणी निर्माण होणार असून, सर्वसामान्यांचे घर खरेदीचे स्वप्नही लांब राहण्याची शक्यता आहे. सरकारने विशिष्ट क्षेत्रफळाच्या सदनिकांना स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आदींमध्ये सवलत दिली, तर ते योग्य होईल. – नितीन देशपांडे, अध्यक्ष, मराठी बांधकाम व्यवसाय संघटनाकोट २

शहरात रेडीरेकनरचे दर सरासरी पाच टक्के वाढले आहेत. त्याचा थेट परिणाम मुद्रांक शुल्क, जमीन दर आणि अपार्टमेंटच्या किमतीवर होणार आहे. शासनाच्या निर्बंधांमुळे विकासकांना रेडीरेकनर दराखाली विक्री करता येत नाही. तसे केल्यास अतिरिक्त कर लागू शकतो. गेल्या तीन वर्षांत रेडीरेकनरचा दर स्थिर ठेवल्याने बांधकाम व्यवसाय क्षेत्राला स्थिरता मिळाली. मात्र, रेडीरेकनरचे दर वाढल्यामुळे पुण्यातील सदनिकांच्या किमती सातत्याने वाढतच राहतील. – मनीष जैन, अध्यक्ष, क्रेडाई, पुणेचौकट

दुकानांचे दर जंगली महाराज रस्त्यावर सर्वाधिक

जंगली महाराज रस्त्यावरील दुकानांचे दर सर्वाधिक ठरले आहेत. या रस्त्यावरील गरवारे आयलंड ते बालगंधर्व रंगमंदिर या दरम्यान दुकानांचा प्रतिचौरस फूट दर हा ४४ हजारांहून अधिक आहे. मोकळ्या जागांमध्ये प्रभात रस्ता सर्वांत महाग आहे. या रस्त्यावरील मोकळ्या जागांचा प्रतिचौरस फुटांचा दर ९ हजारांपेक्षा जास्त असून, विधी महाविद्यालय परिसरातील मोकळ्या जागांचा दरही साधारण तेवढाच आहे.