पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर भागात मोटारचालक आणि साथीदारांनी रखवालदारावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना नुकतीच घडली होती. आरोपींनी केलेल्या दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या रखवालदाराच्या पत्नीचा बुधवारी सायंकाळी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शीतल अक्षय चव्हाण (वय २९, रा. चव्हाण वस्ती, थेऊर) असे उपचारादरम्यान मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींविरुद्ध दाखल गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी दिली. याप्रकरणी भानुदास शिंदे, अजय मुंढे, सतीश उर्फ नाना मुंढे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा : नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी; मध्यभागात कोंडी

पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर फाटा परिसरात हाॅटेल जय मल्हारजवळ मोकळी जागा आहे. तेथे अक्षय चव्हाण रखवालदार म्हणून काम करत आहे. शुक्रवारी (२७ डिसेंबर) सकाळी सव्वाआठच्या सुमारास आरोपी शिंदे, मुंढे मोटारीतून थेऊर फाटा परिसरातून निघाले होते. आरोपींनी हाॅटेल जय मल्हारजवळील मोकळ्या जागेत मोटार थांबविली. आरोपींनी तेथे लघुशंका केली. तेव्हा रखवालदार अक्षय चव्हाणने आरोपींना हटकले. त्यानंतर एका आरोपीने त्याच्याकडील देशी बनावटीच्या पिस्तुलातून चव्हाण याच्यावर गोळीबार केला. चव्हाणची पत्नी शीतल तेथे धावत आली. तेव्हा आरोपींनी दगडफेक केली. डोक्याला दगड लागल्याने शीतल गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी झालेल्या शीतलचा बुधवारी सायंकाळी उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. शीतलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.