पुणे : बाजीराव रस्त्यावरील एका मोटार सजावट साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यानी १३ लाख ८० हजारांची रोकड चोरुन नेले. रविवार पेठेतील कापडगंज परिसरातील एका वस्त्रदालनातून चोरट्यांनी एक लाख ६८ हजारांची रोकड आणि लॅपटाॅप चोरुन नेला.
याबाबत दुर्गा कार डेकाॅरचे मालक अमित जयप्रकाश तांदळे (वय ४२, रा. सदाशिव पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांदळे यांचे बाजीराव रस्त्यावरील पूरम चौक परिसरात दुर्गा कार डेकाॅर दुकान आहे. या दुकानात मोटार सजावटीचे साहित्य विक्री केले जाते. तांदळे यांचा जुना मोटार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे.
चोरट्यांनी दुकानाचा लोखंडी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. तांदळे यांनी दुकानातील कप्प्यात रोकड ठेवली होती. कप्प्यात ठेवलेली १३ लाख ८० हजारांची रोकड चोरुन चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेच्या निरीक्षक शर्मिला सुतार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगाळे तपास करत आहेत.
रविवार पेठेतील वस्त्रदालनात चोरी
रविवार पेठेतील कापडगंज परिसरात असलेल्या वस्त्रदालनातून एक लाख ६८ हजारांची रोकड आणि लॅपटाॅप असा एक लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. याबाबत गोविंद राजाराम मुंदडा (वय ६५, रा. गंगाधाम, मार्केट यार्ड) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुंदडा यांचे कापडगंज परिसरात साडी विक्रीचे दालन आहे. चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील गल्ला उचकटून रोकड आणि लॅपटाॅप चोरुन चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे तपास करत आहेत.