३० मे पासून सेवा सुरू होणार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : देशातील पहिल्या दहा विमानतळांपैकी एक असलेल्या पुणे विमानतळाच्या प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या पाश्र्वभूमीवर पुणे ते भोपाळ आणि भोपाळ ते पुणे थेट विमानसेवेसाठी एअर इंडियाकडून वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. ही सेवा येत्या ३० मे पासून सुरू करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत १४.६ टक्क्य़ांनी वाढ झाली. त्यामुळे पुणे विमानतळाने प्रवासी वाढीत प्रमुख विमानतळांमध्ये पाचवे स्थान मिळवले आहे. पुणे विमानतळावरून प्रतिदिन दोनशे विमानांची ये-जा होते. तर, प्रवासी संख्या वार्षिक ८२ लाखांच्या पुढे आहे.

पुणे शिक्षण, उद्योग, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर असल्याने विमानांच्या फेऱ्या आणि संख्या वाढवण्याची मागणी वारंवार प्रवाशांकडून होते. या पाश्र्वभूमीवर पुणे ते भोपाळ आणि भोपाळ ते पुणे या थेट विमानसेवेसाठी वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.

भोपाळहून सकाळी १०.४५ वाजता पुण्यासाठी विमानाचे उड्डाण होणार असून पुण्यातून भोपाळसाठी दुपारी १२.०५ वाजता उड्डाण होणार आहे. ही सेवा शनिवार सोडून इतर सर्व दिवशी सुरू राहणार असल्याची माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पुणे विभागाने ट्विटरद्वारे जाहीर केली आहे. एआय ४८१ आणि एआय ४८२ ही विमाने पुणे ते भोपाळ आणि भोपाळ ते पुणे सेवेसाठी असतील.

उड्डाणांच्या संख्येत वाढ

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार देशातील दहा विमानतळांमध्ये बेंगळुरू पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल अहमदाबाद, हैद्राबाद आणि चेन्नई विमानतळ आहेत. पुणे विमानतळ पाचव्या स्थानी असून गेल्या वर्षी नोव्हेंबपर्यंत पुणे विमानतळावरून देशांतर्गत विमान उड्डाणांच्या संख्येत १२ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune to bhopal airline service will start from may