पुणे : उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने साप्ताहिक सुपरफास्ट गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. पुणे ते झाशी ही साप्ताहिक विशेष गाडी ६ जुलै ते २८ सप्टेंबर या कालावधीत चालविली जाणार आहे.
मध्य रेल्वेकडून पुणे ते झाशी या साप्ताहिक गाडीच्या २६ फेऱ्या होणार आहेत. या गाडीमुळे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. ही गाडी ६ जुलै ते २८ सप्टेंबर या दरम्यान चालविली जाणार आहे. सध्या उत्तर भारताशी जोडल्या जाणाऱ्या गाड्यांतील गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या गाडीला दौंड दोरमार्ग, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, नर्मदापुरम, भोपाळ, विदिशा, बिना आणि ललितपूर हे थांबे आहेत.
हेही वाचा – मॉडेलिंगची छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार; नाशिकमधील तरुण अटकेत
पुण्यातून ही विशेष गाडी दर गुरुवारी दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी रवाना होईल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशी येथे पोहोचेल. ही गाडी वीरांगणा राणी लक्ष्मीबाई झाशी येथून दर बुधवारी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. या गाडीचे तिकीट आरक्षण सुरू झाले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी दिली.