रेल्वेच्या दशवार्षिक कामांचा परिणाम; पुणे-लोणावळा मार्गावरील खडी बदलण्यास सुरुवात

लोहमार्गाखालील खडी बदलण्याचे दशवार्षिक काम सध्या पुणे- लोणावळा मार्गावर करण्यात येत आहे. त्याचा परिणाम पुणे- लोणावळा लोकल गाडय़ांच्या वाहतुकीवर झाला असून, दुपारच्या वेळेतील काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. या गाडय़ा १७ ऑक्टोबपर्यंत रद्द राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून देण्यात आली.

रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे- लोणावळासह पुणे- दौंड आणि कोल्हापूर मार्गावर लोहमार्ग, सिग्नल यंत्रणा आदींच्या दुरुस्ती देखभालीची कामे एकाच वेळी करण्यात येत आहेत. त्यामुळे विभागातील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुणे- लोणावळा विभागामध्ये सध्या तीन अत्याधुनिक यंत्रांच्या माध्यमातून रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. रुळांमधील जुनी खडी काढून नवीन खडी टाकण्याचे कामही (बॅलॉस्ट क्लिनिंग) करण्यात येत आहे. खडी बदलण्याचे हे काम दहा वर्षांतून एकदा करण्यात येते. थंडीच्या मोसमामध्ये रेल्वे रुळांना तडे जाण्याचे प्रकार होत असतात. खडी बदलण्याच्या या कामातून तडे जाण्याचे प्रकार कमी करणे शक्य होते. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

पुणे रेल्वेचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी याबाबत सांगितले, की लोहमार्ग दुरुस्ती आणि खडी बदलण्याच्या कामासाठी अत्याधुनिक यंत्रे पुणे विभागासाठी काही कालावधीसाठीच उपलब्ध करून देण्यात आली असल्याने त्या काळातच कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक दिवशी कमीत कमी तीन तासांचा ब्लॉक घेणे आवश्यक आहे.

कर्जत-पुणे पॅसेंजर कायम

लोहमार्ग दुरुस्ती देखभालीच्या कारणास्तव १ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत चार लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून दुपारी १२.१५ आणि १.०० वाजता लोणावळ्यासाठी सुटणाऱ्या आणि लोणावळ्याहून दुपारी २.०० आणि ३.४० वाजता सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. या कालावधीत लोणावळ्याहून दुपारी २.४० वाजता पुण्यासाठी सुटणारी लोकल आणि पुण्याहून सकाळी ११.१५ वाजता सुटणारी कर्जत पॅसेंजर सुरू राहणार आहे.