दिवाळीत प्रवाशांची मागणी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) पुणे-नागपूर मार्गावर १९ ऑक्टोबरपासून शिवनेरी व्हॉल्व्हची जादा फेरी सोडण्यात येणार आहे. एसटीच्या वाकडेवाडी येथील स्थानकातून ही गाडी सोडण्यात येणार आहे. पुणे आणि नागपूर या दोन्ही बाजूने २३ ऑक्टोबरपर्यंत जादा गाडी धावणार असल्याचे एसटीच्या पुणे विभागाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा : विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?
हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?
दिवाळीमध्ये पुण्यातून सर्वाधिक मागणी विदर्भात जाण्यासाठी असते. त्यात नागपूर आणि अमरावती भागांत जाणारे प्रवासी सर्वाधिक असतात. या मार्गावर खासगी प्रवासी गाड्यांनाही मोठी मागणी असते. दिवाळीच्या कालावधीत काही खासगी वाहतूकदार मनमानी पद्धतीने भाडेवसुली करीत असल्याच्या तक्रारीही दरवर्षी होतात. प्रवाशांची मागणी लक्षात घेता एसटीकडूनही जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येतात. त्यानुसार १९ ऑक्टोबरपासून एक जादा गाडी जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा : पुणे : दिवाळीच्या मुहूर्तावर पुरंदर विमानतळाचे ‘उड्डाण’
वाकडेवाडी (शिवाजीनगर) ते नागपूर ही गाडी १९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत संध्याकाळी पाच वाजता वाकडेवाडी स्थानकातून सोडण्यात येईल. २० ते २४ ऑक्टोबर या कालावधीत नागपूरहून वाकडेवाडीसाठी संध्याकाळी पाच वाजताच गाडी सोडण्यात येणार आहे. या प्रवासासाठी प्रौढांना २४१५ रुपये, तर मुलांना १२१० रुपये भाडे आकारणी केली जाणार आहे. दोन्ही बाजूच्या गाड्यांचे आरक्षण सुरू करण्यात आले असून, त्यासाठी शिवाजीनगरचा सांकेतिक क्रमांक ‘एसएनजीआर’, तर नागपूरचा सांकेतिक क्रमांक ‘एनजीपीसीबीएस’ असा आहे. या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटीच्या पुणे विभागाचे नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.